उत्सवाच्या तयारीत सर्वांचे योगदान

By Admin | Updated: January 15, 2015 23:31 IST2015-01-15T21:42:46+5:302015-01-15T23:31:10+5:30

भारतीय संस्कृती उत्सव : दिवसागणिक गर्दीत वाढ : सिद्धगिरी मठावर महाविद्यालयांचे श्रमसंस्कार शिबिर

The contribution of all the festive occasions | उत्सवाच्या तयारीत सर्वांचे योगदान

उत्सवाच्या तयारीत सर्वांचे योगदान

कोल्हापूर/कणेरी : स्वच्छता, सजावट, प्रदर्शनाची रचना अशा विविध स्वरूपातील श्रमदानात तरुणाई गुंतली आहे. चौथे भारत विकास संगम अंतर्गत कणेरी (ता. करवीर) येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावर होणाऱ्या भारतीय संस्कृती उत्सवात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) श्रमसंस्कार शिबिर होत आहे. त्याअंतर्गत उत्सवाच्या तयारीत आपापल्या पद्धतीने युवक-युवती योगदान देत आहेत.
उत्सवासाठी देशाच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक, लोक येणार आहेत. त्यादृष्टीने परिसराची स्वच्छता, जेवण, निवास, स्वच्छतागृहे आदींची उभारणीचे काम मठाच्या परिसरात सुरू आहे. त्यासाठी भाविक, परिसरातील गावांमधील नागरिक श्रमदान करत आहेत. त्यात जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या माध्यमातून तरुणाई सक्रिय झाली आहे. महाविद्यालयांनी त्यांची या ठिकाणी निवासी श्रमसंस्कार शिबिरे आयोजित केली आहेत. त्याअंतर्गत उत्सवाच्या मुख्य सोहळा होणाऱ्या परिसरातील स्वच्छता, पायाभूत सुविधांची उभारणी त्यात उत्स्फूर्तपणे युवक-युवती कार्यरत आहेत. हातात खराटा, खुरपे, फावडे, पाटी घेऊन स्वच्छता करणे असो अथवा मुरूम टाकणे, दगडे बाजूला करून रस्ता तयार करणे अशा स्वरूपातील कामे तरुणाईकडून उत्साहीपणे सुरू आहेत. दररोज किमान शंभर तरुण-तरुणी या ठिकाणी सुरू असलेल्या प्रदर्शन, कलादालन, शेती, सजावट, आदींमध्ये आपापल्या पद्धतीने मदत करत आहेत. आतापर्यंत न्यू कॉलेज, राजाराम महाविद्यालय, भारती कॉलेज आॅफ फार्मसी, कणेरी एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांचे याठिकाणी शिबिरे झाली आहेत. काही महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी एक दिवस श्रमदान करून गेले आहेत. कागल, पेठवडगाव, गडहिंग्लज तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही महाविद्यालये येत्या दोन-तीन दिवसांत याठिकाणी श्रमदानासाठी दाखल होणार आहेत. दरम्यान, देणगीप्रमाणेच श्रमदानाची या उत्सवासाठी मोठी गरज असून, त्यात रोज किमान शंभर लोक योगदान देत आहेत. याठिकाणी असलेल्या प्रदर्शनातील शिल्प, पुतळे तयार करण्याचा कारागिरांचा वेग वाढला आहे. उत्सवाची तयारी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. (प्रतिनिधी)

तरुण सरसावले
कणेरीसह कोगील बुद्रुक, कोगील खुर्द, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव या पंचक्रोशीसह जिल्ह्यातील महिला दररोज गारवा भाजी, भाकरी, पुरणपोळी, आंबिल असे पदार्थ आणत असल्यामुळे दररोज संमेलनस्थळी दोन ते तीन हजार लोक भोजन करतात.
जिल्ह्यातील विविध गावांतील युवकांची ‘स्वयंसेवक’ म्हणून नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तीही अहोरात्र झटत आहेत. प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी घेतली असून, आयोजनासाठी तानाजी निकम, अर्जुन इंगळे, आबासोा पाटील, अंकुश पाटील, शशिकांत पाटील, अ‍ॅड. एम. डी. पाटील, विजय पाटील, विष्णू पाटील, अरुण पाटील, रणजित पाटील, महेश मासोळी, राजू घराळ, आदी स्वयंसेवक कार्यरत आहेत.


पाच हजार स्वयंसेवक...
या ठिकाणी शनिवार (दि. १७) पासून येणाऱ्या महाविद्यालयांतील युवक-युवतींना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. शिवाय उत्सवादरम्यान साधारणत: दहा हजार स्वयंसेवकांची गरज भासणार आहे. त्यातील पाच हजार स्वयंसेवकांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयांतून दहा ते पंधरा विद्यार्थी-विद्यार्थिनींना बोलाविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने उत्सवाच्या संयोजकांकडून कार्यवाही सुरू आहे.

दहा प्रदर्शने, सहाशे स्टॉल्स् तयार...
भारतीय संस्कृती उत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. त्यातील १३ पैकी १० प्रदर्शने तयार झाली आहेत. त्यामध्ये लखपती शेती, पुष्पप्रदर्शन, आरोग्य, बैलजोडी, शाहू कलादालन तसेच झांबुआतील आदिवासी आणि भिल्ल जमातीतील कलाकारांनी साकारलेले सदृढ गाव आणि मागास गाव तयार झाले आहे. शिवाय उत्सवस्थळी सेंद्रीय खते, पुस्तके, कलाकुसरीच्या वस्तू, आदींसह देशभरातील विविध सुमारे दोनशे स्वयंसेवी संस्थांच्या सहाशे स्टॉल्स्ची उभारणी पूर्ण झाली आहे.

सिद्धेश्वर स्वामींची भेट...
उत्सवस्थळी विविध क्षेत्रांतील मान्यवर भेटी देत आहेत. आज, गुरुवारी विजापूर (कर्नाटक)मधील सिद्धेश्वर स्वामी, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी भेट दिली. त्यांनी तयारीची पाहणी केली. शिवाय काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याशी उत्सवाबाबत चर्चा देखील केली.

भारतीय परंपरा, संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या उत्सवातील एक घटक म्हणून काम करत असल्याचा युवक-युवतींना आनंद आहे. सध्याच्या ‘सोशल मीडिया’च्या युगात निसर्गाच्या सान्निध्यात राहून श्रमदान करण्याचा वेगळा अनुभव त्यांना मिळत आहे. श्रमदान शिबिराच्या समारोपावेळी युवक-युवती त्याबाबत आवर्जून सांगतात.
- प्रा. श्रीधर साळुंखे

Web Title: The contribution of all the festive occasions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.