दिव्यांगांच्या स्वालंबनासाठी योगदान द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:47+5:302020-12-05T04:55:47+5:30
कोडोली : दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची गरज असून समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे. दिव्यांगांसाठी ...

दिव्यांगांच्या स्वालंबनासाठी योगदान द्यावे
कोडोली : दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याची गरज असून समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावे. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना असून त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.
जागतिक अपंग दिनानिमित्त कोडोली (ता. पन्हाळा) येथील सर्वोदय सांस्कृतिक हॉलमध्ये गुरुवारी रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर व निर्माण सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृत्रिम हात, कृत्रिम पाय, व्हीलचेअर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्रासह राजस्थान, कर्नाटक, उत्तर प्रदेशातून आलेल्या ६५ लाभार्थींना एल एन -४ कृत्रिम हात, ४ लाभार्थींना कृत्रिम पाय, २ लाभार्थींना वॉकर व ५ लाभार्थींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या नाममात्र भाड्यात रुग्ण साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य सेवा प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. डॉ. सतीश पाटील, डॉ. अमित सूर्यवंशी, डॉ. श्यामप्रसाद पावसे, डॉ. अभिजित जाधव यांना कोविड काळातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीकांत झेंडे, ऋषीकेश केसकर, गिरीश लिंबडा, स्नेहा शेटे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे, सहायक गटविकास अधिकारी सावंत, कोडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेंद्र तळपे, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम, रोटरी ग्रामसेवा केंद्राचे सदस्य सुनील पोवार, प्रकाश सूर्यवंशी, कृष्णात जमदाडे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
प्रवीण बजागे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सचिव जयदीप पाटील यांनी आभार मानले.