विकासाच्या गारुडाखाली हिंदू राष्ट्राची बांधणी
By Admin | Updated: May 29, 2015 23:49 IST2015-05-29T22:47:13+5:302015-05-29T23:49:03+5:30
किशोर बेडकीहाळ : शमशुद्दीन मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार प्रदान

विकासाच्या गारुडाखाली हिंदू राष्ट्राची बांधणी
कोल्हापूर : आपण निर्बुद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या अंधारयुगात प्रवेश केला आहे. जिथे राज्यघटनेशी विसंगत बाबींना प्रतिष्ठा मिळत आहे. विकास नावाच्या गारूडाखाली हिंदू राष्ट्र आणि मतांची बांधणी करणाऱ्या हुकुमशाहीचा हा उत्कर्षाचा काळ आहे. येथे आपल्यापुढे प्रश्न न विचारता जे घडतंय त्याला मूकसंमती देण्याला पर्याय नाही कारण हिंदुत्वाचा राजकीय शक्ती म्हणून वापर होत आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी सध्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीवर टीका केली. शाहू स्मारक भवनात गुरुवारी भाई माधवराव बागल विद्यापीठाच्यावतीने बागल यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांना भाई माधवराव बागल पुरस्कार देण्यातआला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अॅड. अशोकराव साळोखे अध्यक्षस्थानी होते. शाल, सन्मानचिन्ह, रोख रक्कम रुपये पाच हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बेडकीहाळ म्हणाले, हिंदुत्वाच्या हुकूमशाहीची मुळे मुसोलिनी, हिटलर आणि त्यानंतर इस्रायलमधील समाज जीवनाखाली दडली आहेत. जिथे अल्पसंख्याकांना जगण्याचा हक्कच नाकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्ही किती चांगले आहोत हे जगभर सांगत फिरत आहेत. शमशुद्दीन मुश्रीफ म्हणाले, पूर्वीच्या काळीही जातीय दंगली व्हायच्या, पण त्याचे स्वरूप तत्कालीन असायचे. १८५० नंतर मात्र बहुजन समाजाला जातीयवाद्यांमुळे आपले दमन होत असल्याची जाणीव होऊ लागली. १८९०मध्ये समाजक्रांतीच होईल, अशी परिस्थिती होती. अशा काळात जातीयवाद्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बहुजन समाजाला मुस्लिमांच्या मागे लावले.
त्यामुळे जातीयवाद्यांवरील लक्ष विचलित झाले. या परिवर्तनवादी चळवळीला स्वातंत्र्यसंग्रामामुळे ब्रेक लागला. (प्रतिनिधी)
‘लोकमान्य’ पदवी का दिली?
या व्याख्यानात दोन्ही वक्त्यांनी लोकमान्य टिळक आणि ‘केसरी’वर सडकून टीका केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ अशी टिळकांनी घोषणा केली असली, तरी त्यांना अभिप्रेत असलेले स्वराज्य वेगळे होते. टिळकांनी नेहमी जातीयवाद्यांचा पुरस्कार केला. बहुजन आणि स्त्री शिक्षणाला विरोध करणाऱ्या टिळकांना ‘लोकमान्य’ ही पदवी दिलीच कशी ? असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.