करवीर मतदारसंघ भाजपलाच हवा
By Admin | Updated: July 30, 2014 00:43 IST2014-07-30T00:41:35+5:302014-07-30T00:43:18+5:30
कार्यकर्त्यांची मागणी : प्रयाग चिखलीत कार्यकर्त्यांची बैठक

करवीर मतदारसंघ भाजपलाच हवा
वडणगे : गेली दहा वर्षे आमच्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे नुकसान होऊ लागले आहे. यापुढे हा अन्याय सहन करणार नाही. आमच्या हक्काचा मतदारसंघ आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी मागणी बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.
प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील करवीर, पन्हाळा व गगनबावडा पदाधिकाऱ्यांच्या संत ज्ञानेश्वर समूहाचे संस्थापक पै. संभाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
भाजपचे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. १९९० साली दिलीप भिवटे, १९९५ ला बाबा देसाई, तर १९९९ ला संग्राम गायकवाड यांनी भाजपमधून निवडणूक लढवून चांगली मते मिळविली आहेत. २००४ साली तर भाजपच्या पाठिंब्यावर सतेज पाटील यांनी निवडणूक लढविली व २००९ ला काँग्रेसमधून आलेल्या चंद्रदीप नरके यांनी वरिष्ठ पातळीवरून तिकीट मिळवून भाजपची मदत घेतली.या सर्व घडामोडींनी भाजपच्या मतावर अन्य पक्षाचा फायदा होतो. त्यामुळे भाजपच्या पक्ष संघटनावर परिणाम होत आहे. आपल्या हक्काचा मतदारसंघ दुसऱ्यांना दिल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे. मात्र, आता आपण लढायचच आणि हा मतदारसंघ पुन्हा हिसकावून घेऊ देणार नाही, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. संभाजीराव पाटील म्हणाले, गेल्यावेळी चुकीचे सांगून आमचा मतदारसंघ घेतला. मात्र, यावेळी असे खपवून घेणार नाही. के. एस. चौगले, मारुती परितकर (मोरेवाडी), रंगराव व्हरांबळे (केर्ली), मधुकर दुधाणे (वरणगे), सरदार जाधव (वडणगे), दिलीप एकशिंगे (निगवे), अर्जुन पाटील (मुटकेश्वर), लक्ष्मण पाटील (पन्हाळा तालुकाध्यक्ष), शिवाजी पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), गामा पाटील (क।। ठाणे), बाजीराव लव्हटे (म्हाळुंगे), हैबती मगदूम (पुनाळ), रघुनाथ झेंडे (पडळ), आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. आनंदराव पवळ यांनी स्वागत केले, तर सुरेश बेनाडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)