काँग्रेस इचलकरंजी झोपडपट्टीमुक्त करणार
By Admin | Updated: September 7, 2014 23:21 IST2014-09-07T22:36:20+5:302014-09-07T23:21:24+5:30
प्रकाश आवाडे यांची माहिती : नवीन भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन

काँग्रेस इचलकरंजी झोपडपट्टीमुक्त करणार
इचलकरंजी : यंत्रमागाचे केंद्र असल्यामुळे इचलकरंजी शहरात कामगार वस्ती अधिक आहे. त्यामुळे काही ठिकाणी झोपडपट्ट्या वसल्या आहेत. कॉँग्रेसच्या आघाडी सरकारच्या विविध योजनांमधून सध्या झोपडपट्टीवासीयांना घरकुले बांधून दिली जात आहेत. उर्वरित झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनातून लाभार्थ्यांना घरकुले देऊन शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा कॉँग्रेसचा निर्धार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत १८१ लाभार्थ्यांना घरकुले बांधण्याची पायाभरणी व नवीन भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.
आवाडे म्हणाले, नगरपालिकेमार्फत सुरू असलेल्या एकूणच विकासकामांचा आढावा घेतला. विकासकामे व लोकाभिमुख सेवा-सुविधा देताना विरोधकांकडून राजकीय खेळीपोटी अटकाव केला जात आहे; पण त्याला न जुमानता कॉँग्रेस आघाडीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे केली जातील. भुयारी गटार योजनेने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी माजी आमदार अशोकराव जांभळे, नगराध्यक्षा बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, ज्येष्ठ नगरसेवक भीमराव अतिग्रे, नगरसेविका रत्नप्रभा भागवत, आदींची भाषणे झाली. कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, बांधकाम सभापती महेश ठोके, पाणीपुरवठा सभापती श्रीरंग खवरे, प्रकाश मोरे, अशोकराव आरगे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी व ‘शविआ’चा बहिष्कार
नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय व राष्ट्रवादी अशी दोन्ही कॉँग्रेसची सत्तारूढ आघाडी आहे, तर विरोधी पक्ष म्हणून शहर विकास आघाडी कार्यरत आहे. सत्तारूढ आघाडीमधील जांभळे गट वगळता आजच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांनी बहिष्कार टाकला. त्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रचार प्रारंभाला माजी खासदार निवेदिता माने मुंबई येथे आज जाणार हे माहीत असूनसुद्धा कॉँग्रेसने आजचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळेच या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहणार नाही, अशी माहिती पक्षप्रतोद रवींद्र माने यांनी दिली. त्याचबरोबर या दोन्ही विकासकामांसाठी स्थानिक खासदार व आमदार यांना निमंत्रण नसल्याने शहर विकास आघाडी त्याचा निषेध करीत आहे आणि या कार्यक्रमांना उपस्थित राहणार नाही, असे पक्षप्रतोद जाधव यांनी सांगितले.