काँग्रेस आघाडीच सत्तेच्या जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:46 IST2017-03-08T00:46:24+5:302017-03-08T00:46:24+5:30

जिल्हा परिषद : चंदगड आघाडीचाही पाठिंबा शक्य

Congress is the only leader in front of power | काँग्रेस आघाडीच सत्तेच्या जवळ

काँग्रेस आघाडीच सत्तेच्या जवळ


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात दोन्ही काँग्रेसची आघाडीच सत्तेच्या जवळ असल्याचे चित्र आज तरी दिसत आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असली तरी चंदगडच्या युवक क्रांती आघाडीच्या दोन जागा या राष्ट्रवादीसोबत राहणार असे संकेत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच ‘त्यांना चाकोरी सोडून जायचे नाही,’ असे स्पष्ट शब्दांत बजावले असल्याचे समजते. त्यांना सहलीवर नेण्यामागे हाच दबाव असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेत शिवसेनेकडे दहा जागांसह सत्तेच्या चाव्या असल्या तरी त्या पक्षाचाच ठोस असा निर्णय झालेला नाही. मुंबई पालिकेत काय होते यावर येथील निर्णय अपेक्षित होता. मुंबईत भाजपने जरी सत्तेतून अंग काढून घेतले असले तरी शिवसेनेने त्यास मनापासून ‘टाळी’ दिलेली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले आहे. मुंबईची महापौर निवड आज (बुधवारी) होत आहे. त्यानंतरही यातील घडामोडी वेग घेऊ शकतात; परंतु तरीही एकूण होरा पाहता ‘मुंबईत काही झाले तरी स्थानिक राजकारणात तुम्हाला सोयीची असेल अशी भूमिका घ्या,’ असाच निर्णय शिवसेनेकडून होण्याची शक्यता जास्त आहे.
भाजप-जनसुराज्य व ताराराणी आघाडी अजूनही २५ वरच अडकली आहे. त्यातही चंदगड आघाडी बाजूला गेल्यास त्यांची संख्या दोनने कमी होते. शिवसेनेच्या दहा सदस्यांनी एकमुखी भाजपला पाठिंबा दिल्यास त्यांना उपाध्यक्षपद द्यावे लागेल. शिवसेनेत सर्वाधिक तीन सदस्य आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे आहेत. त्यांना हे पद देण्याचा प्रस्ताव आल्यास जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे हे मान्य करणार नाहीत. उपाध्यक्षपद कोरे यांच्या पक्षाला द्यायचे झाल्यास त्यास शिवसेनेतील आमदार नरके व आमदार सत्यजित पाटील यांचाही गट पाठिंबा देणार नाही, असे त्रांगडे झाले आहे. त्यामुळे नक्की काय होईल हे सांगणे अवघड होऊन बसले आहे.
भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुण इंगवले यांचे नाव पुढे आले आहे; परंतु त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत संदिग्धता निर्माण झाल्यास शौमिका महाडिक यांचे नाव स्पर्धेत पुढे येऊ शकते. ‘सुरुवातीच्या टप्प्यात अध्यक्षपद खुले असताना महिलेला संधी कशाला’ अशी भूमिका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतली असली तरी ते गप्प बसलेले नाहीत. गेल्यावेळेला आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या मुलाला अध्यक्षपदाची संधी मिळू दिली नाही. त्यामुळे आता ते ही संधी सुनेसाठी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तशा जोडण्या सुरू झाल्या आहेत. इंगवले यांच्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांचा आग्रह आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचाही इंगवले यांच्या नावाला ‘ग्रीन सिग्नल’ आहे; परंतु दाखल्याचा विषय पुढे करून उगीच रिस्क नको, असा विचार झाल्यास चित्र बदलू शकते.


काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अशी ‘जोडणी’
सद्य:स्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे त्यांचे स्वत:चे २५ सदस्य आहेत. त्याशिवाय आमदार प्रकाश आबिटकर-माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचे दोन, माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाचे दोन, शिंगणापुरातून विजयी झालेल्या अपक्ष रसिका पाटील असे तीस सदस्य होतात. त्यात चंदगड आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रत्येकी दोन सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ३४ पर्यंत पोहोचते. एकदा सत्ता त्यांची येणार हे स्पष्ट झाल्यावर शिवसेनेतील काही सदस्यांचा पाठिंबा या आघाडीला मिळू शकतो, तशा हालचाली आहेत.
सेनेचा निर्णय ११ला शक्य
मुंबई महापौरपदाची निवड आज, बुधवारी असली, तरी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल शनिवारी (दि. ११) आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला कितपत यश मिळते. हे पाहून शिवसेना महाराष्ट्रात कोल्हापूरसह अन्य जिल्हा परिषदांमधील सत्तेबाबत भाजपशी जमवून घ्यायचे की नाही हे ठरविण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Congress is the only leader in front of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.