कागलमध्ये अनेक ठिकाणी मंडलिक-राजे गट एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:09+5:302021-01-08T05:18:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कार्यकर्त्यांनी आपल्याला सोयीस्कर ...

Congregation-king groups gather at several places in Kagal | कागलमध्ये अनेक ठिकाणी मंडलिक-राजे गट एकत्र

कागलमध्ये अनेक ठिकाणी मंडलिक-राजे गट एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

कागल : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी कार्यकर्त्यांनी आपल्याला सोयीस्कर अशाच आघाड्या केल्या. तालुक्यात महाविकास आघाडी काही गावात दिसत असली, तरी मंडलिक गटाने अनेक ठिकाणी राजे गटाबरोबर सलगी केल्याचे दिसून आले.

तालुक्यात मंत्री मुश्रीफ आणि मंडलिक गटाची जवळीक असताना तसेच संजय घाटगेंची सध्याची भूमिका ही मुश्रीफ गटाबरोबर जमवून घेणारी असल्याने राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न तालुक्यात दिसेल, अशा पद्धतीने ग्रामपंचायतीमध्ये आघाड्या असाव्यात, असे संकेत नेतेमंडळींनी सुरुवातीला दिले होते. त्यातून भाजप विरूद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असे चित्र होईल आणि समरजित घाटगे गट एकाकी पडेल, असा मनसुबा होता. मात्र, अनेक गावांमध्ये मंडलिक-राजे गट एकत्र आल्याने नेत्यांच्या इच्छेला स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘खो’ घातला आहे.

आघाड्यांचे ठळक चित्र

राजे-मंडलिक विरूद्ध मुश्रीफ-घाटगे गट असे चित्र वंदुर ,करनुर, शेंडुर, साके, यमगे, उंदरवाडी, शिंदेवाडी आदी गावात आहे. तर लिंगणूर कापशी येथे राजे -मंडलिक विरूद्ध मुश्रीफ आणि डावी आघाडी असे चित्र आहे. माद्याळमध्ये राजे गट - संजय घाटगे गट एकत्र तर मळगे बुद्रुक आणि तमनाकवाडामध्ये मुश्रीफ गटातील एका गटाने राजे गटाबरोबर युती केली आहे. बिद्री, केनवडे, लिंगणूर दुमाला, चिखली, मेतके, व्हन्नुर आदी गावात महाविकास आघाडी आहे. मांगणूर ,बोळावीवाडी, हळदी या गावात सर्व गट विरूद्ध अपक्ष बंडखोर असे चित्र आहे. एकोंडीसारख्या गावात तर चार पॅनेल झाली आहेत.

४ ग्रामपंचायती बिनविरोध...

तालुक्यातील वडगाव, कुरूकली, गोरंबे, मौजे सांगावं या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

Web Title: Congregation-king groups gather at several places in Kagal