विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव
By Admin | Updated: December 12, 2014 00:34 IST2014-12-12T00:30:03+5:302014-12-12T00:34:43+5:30
‘ए’ मानांकन : यशाची नवी शिखरे गाठूया : एन. जे. पवार

विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव
कोल्हापूर : ‘अ’ मानांकनामुळे आता आपला आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा उपयोग यशाची आणखी उंच आणि नवी शिखरे काबीज करण्यासाठी करू या, असे आवाहन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, गुरुवारी येथे केले.
विद्यापीठातील सर्व अधिविभागप्रमुख आणि प्राध्यापक, प्रशासकीय सेवकांची संयुक्त बैठक ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘नॅक’च्या ‘अ’ मानांकनामुळे आता विद्यापीठाशी संबंधित सर्वच घटकांवरील जबाबदारी वाढली आहे. आपणा सर्वांच्या सांघिक भावनेमुळे मिळालेले हे यश असून, या पुढील काळातही येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचे सोन्याच्या संधीत रूपांतर करण्यासाठी सांघिकपणानेच प्रयत्न करूया. त्या दृष्टीने योग्य नियोजन करण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेचे (नॅक) ‘अ’ मूल्यांकन जाहीर झाल्याने आज दिवसभरात शिवाजी विद्यापीठावर शैक्षणिक, सामाजिक, आदी संस्था-संघटनांनी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यात कुलगुरू डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, आदींना प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिवसभर ओघ सुरू होता.
शिवाय दूरध्वनी, मोबाईल, एसएमएस, सोशल मीडिया, ई-मेल आदींंच्या माध्यमातून अभिनंदनांचा वर्षाव झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील, ‘नॅक’चे समन्वयक डॉ. गणेश हेगडे, आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे डॉ. संजय डी. पाटील, मुंबई विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. राजपाल हांडे, शाहू शिक्षण संस्थेचे चंद्रकांत बोंद्रे, अशोकराव माने शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुद्गल, प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील, डॉ. नलवडे, डॉ. क्रांतिकुमार पाटील, जे. बी. पिष्टे, पुणे विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. नितीन करमरकर, नांदेड विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक डॉ. डी. बी. पानस्कर, डॉ. बी. पी. साबळे, डॉ. डी. व्ही. पवार, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन रावसाहेब शिंदे, अनिल पाटील, गणेश ठाकूर, आदींनी शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)