लोकमत न्यूज नेटवर्क, इचलकरंजी : शहरासंबंधीची जुनी दुर्मीळ पुस्तके, कागदपत्रे, छायाचित्रे व इतिहास जतन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून आपटे वाचन मंदिरने एक अभिनंदनीय उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेकडून योग्य ती मदत दिली जाईल, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले. डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी त्यांचे वडील पिलाजीराव फडणीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून साकार होत असलेल्या 'इचलकरंजी कक्ष' दालनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
बापू तारदाळकर म्हणाले, नाटक, संगीत, उद्योग, क्रीडा, शिक्षण वाङ्मय अशा सर्वच क्षेत्रात शहराने मोठा इतिहास घडविला आहे. भूतपूर्व संस्थानचे अधिपती श्रीमंत घोरपडे यांचेही मोठे योगदान आहे. ऐतिहासिक महत्त्वाची कागदपत्रे, पुस्तके, छायाचित्रे देऊन हा विभाग समृद्ध करावा.
अध्यक्षा सुषमा दातार यांनी स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. अशोक सौंदत्तीकर, गजानन सुलतानपुरे, प्रतिभा काणे, उमेश कुलकर्णी, डॉ. राहुल कुलकर्णी, हर्षदा मराठे, डॉ. कुबेर मगदूम, ॲड. स्वानंद कुलकर्णी, प्रा. सुजित सौंदत्तीकर, राजेंद्र घोडके, प्रा. मोहन पुजारी, मीनाक्षी तंगडी, बाळासाहेब कलागते उपस्थित होते. माया कुलकर्णी यांनी आभार मानले.