प्रोसेडिंगवरून ‘गोकुळ’च्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:56+5:302021-02-05T07:13:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसेडिंग वाचण्यावरून गोंधळ उडाला. ...

प्रोसेडिंगवरून ‘गोकुळ’च्या सभेत गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभेत मागील सभेच्या प्रोसेडिंग वाचण्यावरून गोंधळ उडाला. सभाच झाली नाहीतर प्रोसेडिंग मंजूर कसे करता? असा सवाल करता? विरोधकांनी शेवटपर्यंत हा मुद्दा लावून धरल्याने गोंधळात भर पडली. अखेर विषयपत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मताने मंजूर करण्यात आले.
‘गोकुळ’ची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखाना कार्यस्थळावर झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण नरके होते. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे आजारी असल्याने त्यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लीप दाखविण्यात आली. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. बोर्ड सचिव सदाशिव पाटील हे मागील सभेच्या प्रोसेडिंगचे वाचन करत असताना, विरोधकांनी हरकत घेतली. मागील सभेत दूध उत्पादकांच्या सत्कारापर्यंत सभा चालली होती, त्यानंतर सभाच झाली नाही तर विषय आले कोठून, अशी विचारणा किरणसिंह पाटील यांनी केली. सभा झाली आहे, त्याप्रमाणे शासनाने प्रोसेडिंग मंजूर केल्याचे सभाध्यक्ष अरुण नरके यांनी सांगितले. सभा कशी झाली, हे सगळ्या जिल्ह्याने व महाराष्ट्राने पाहिल्याचे सदाशिव चरापले यांनी सांगितले. सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील, सभा चालवायची आहे, निष्कारण गोंधळ करू नका, असे आवाहन संचालक बाळासाहेब खाडे यांनी केले. सभा झाली तर मग चित्रफीत दाखवा, असा आग्रह बाबासाहेब देवकर यांनी धरला. प्रदीप पाटील-भुयेकर, सचिन घोरपडे, मोहन सालपे, विजयसिंह मोरे, आदींनी आक्रमक भूमिका घेतली. तुम्ही जागेवर जा? सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो, रात्री बारा वाजले तरी चालेल, पण शांततेत प्रश्न विचारा, असे आवाहन अरुण नरके यांनी केले.
यावर, विषय मंजूर करत दुसऱ्या विषयाचे वाचन सुरू केले आणि मंजूर करण्यात आले. संचालक रणजितसिंह पाटील यांनी आभार मानले.
घाणेकरांविरोधात घोषणाबाजी
कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या विरोधात ‘घाणेकर हटाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. सेवानिवृत्त होऊनही त्यांना मुदतवाढ का? अशी विचारणाही करण्यात आली.
अरुण नरकेंनी मुलग्याची शपथ घ्यावी
मागील सभा व्यवस्थित झाली नाही, हे त्यावेळी अरुण नरके यांनी जाहीर केले होते. मग आता समर्थन का करता? नरके यांनी त्यांचा मुलगा चेतन यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, सभा झाली म्हणून, असे माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांनी आवाहन केले.
मग रेडकू आले कोठून?
गेल्या वेळची सभाच झाली नसताना प्रोसेडिंग मंजूर होतेच कसे? याचा अर्थ म्हैस गाभण नसताना रेडकू झाल्याचा प्रकार असल्याची टीका किरणसिंह पाटील यांनी केली.
नरके, चुयेकरांची ढाल नको
स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके यांनी ‘गोकुळ’ उभा केला. मात्र, सत्तारूढ गटाने प्रत्येक वेळी या दोघांचा ढाल म्हणून वापर केल्याचा आराेप किरणसिंह पाटील यांनी केला.
आपटेंसह धुंदरे, जयश्री पाटील यांची रजा
अध्यक्ष रवींद्र आपटे व संचालिका जयश्री पाटील या आजारी असल्याने सभेला उपस्थित नव्हते. या दोघांसह पी. डी. धुंदरे यांनी सभेला अनुपस्थित राहत असल्याबाबत रजा पाठविल्याचे प्रशासनाने सांगितले.
महाडिक यांच्या जयघोषाविनाच सभा
‘गोकुळ’ची सभा म्हटली की संघाचे नेते पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांचा जयघोष ठरलेला असतो. या सभेत मात्र पाटील यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. विरोधी गटाने पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह ‘गोकुळ आमच्या हक्काचे’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राज्यातील सत्तेचे सभेवर सावट
गेल्या दोन्ही सभेत सत्तारूढ गट काहीसा आक्रमक होता. प्रशासनासह सगळी यंत्रणा हातात असल्याने सगळ्या सभेवर त्यांचाच प्रभाव दिसायचा. मात्र, राज्यातील सत्तेचे सावट आजच्या सभेवर दिसले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे दोन नेते थेट विरोधात आहेत, त्यात सत्तारूढ गटांतर्गतच काहीसी धुसफूस असल्याने त्याचे सावट सभेवर दिसत होते.
पेट्रोल पंपाच्या खर्चास मंजुरी
सभेचे कामकाज ४० मिनिटे चालले, यामध्ये विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर आयत्यावेळी संघाच्या पेट्रोल पंपासाठी ६९ लाख रुपये खर्च केला, त्यास मंजुरी देण्यात आली.