यंत्रमागाच्या वीज बिलांबाबत संभ्रम
By Admin | Updated: July 16, 2015 20:51 IST2015-07-16T20:51:06+5:302015-07-16T20:51:06+5:30
दराची उत्सुकता : पंधरा दिवस उलटले तरी बिले नाहीत

यंत्रमागाच्या वीज बिलांबाबत संभ्रम
राजाराम पाटील-इचलकरंजी -महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाने नवीन दरपत्रकाला मंजुरी दिल्यानंतर यंत्रमागाच्या वीजदरामध्ये वाढ होणार, हे निश्चित आहे; पण पंधरा दिवस उलटले तरी यंत्रमागाची विजेची बिले मिळाली नसल्याने विजेच्या नवीन दराविषयी वस्त्रनगरीत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे वीजदराविषयी येथे उत्सुकता निर्माण झाली आहे.
कापड उत्पादनामध्ये विजेची महत्त्वाची भूमिका असल्याने यंत्रमाग उद्योजकांचे लक्ष नेहमीच वीजदरावर असते. ऊर्जा नियामक आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिल्याने यंत्रमागासाठी प्रतियुनिट ७० पैसे आकारणी होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे इचलकरंजीसारख्या दीड लाख माग असणाऱ्या यंत्रमाग केंद्राला महिन्याला तीन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. ज्यामुळे कापडाच्या उत्पादन खर्चात १० टक्के वाढ होणार असल्याने कापड उत्पादक यंत्रमागधारक व व्यापारी धास्तावले आहेत.
महाराष्ट्रात शेतीखालोखाल मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. या उद्योगात एक कोटीहून अधिक लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. त्यामुळे राज्य शासन यंत्रमाग उद्योगाकडे सहानुभूतीने पाहते. सन १९९२-९३ मध्ये तत्कालीन कॉँग्रेस शासनाने यंत्रमागासाठी सवलतीचा दर दिला. त्यानंतर शिवसेना-भाजपच्या युती शासनाच्याही काळात यंत्रमागासाठी सवलतीचा दर चालू राहिला. विजेच्या सवलतीचा दर देण्यासाठी शासन दरवर्षी अनुदानाची तरतूद करीत होते.
गतवर्षी सत्तेवर आलेल्या भाजपप्रणीत शासनाने अनुदान रद्द केले आणि विजेच्या सवलतीचा दर बंद झाला. मात्र, डिसेंबर २०१४ मधील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वीज ग्राहकांनी आंदोलन केले. त्यामुळे तात्पुरती का होईना, अनुदानाची तरतूद शासनाने केली. दरम्यान, वीजदराबाबत ऊर्जा नियामक आयोगाकडे लागलेल्या सुनावणीत यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी मागण्यात आली. तसा सल्ला वीजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला होता.
ऊर्जा आयोगाच्या आदेशानुसार २६ जूनला विजेचे नवीन दरपत्रक महावितरण कंपनीने जाहीर केले आहे. त्यामध्ये यंत्रमागाला स्वतंत्र वर्गवारी दिली असली तरी २७ अश्वशक्तीपर्यंत पाच रुपये ४३ पैसे व २७ अश्वशक्तीच्यावर सहा रुपये ८८ पैसे प्रतियुनिट असे बेसिक दर जाहीर केले आहेत. त्यामुळे विजेची दरवाढ झाली असल्याचे लक्षात येत असले तरी एकाच उद्योगातील विजेच्या भावात तफावत पडत असल्याने यंत्रमागधारक चक्रावले आहेत.
सॉफ्टवेअर मिळाल्यानंतर
यंत्रमागांची बिले
नवीन वीजदराचे पत्रक जाहीर झाले असले तरी महावितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून वीज बिले करण्याविषयी आवश्यक असलेले यंत्रमाग वीज आकारणीचे सॉफ्टवेअर उपलब्ध झालेले नाही. फक्त औद्योगिक वीज आकारणीचे सॉफ्टवेअर मिळाल्याने ही बिले आता वितरित होत आहेत.
मात्र, यंत्रमाग व घरगुती वीज बिले सॉफ्टवेअर उपलब्ध झाल्यानंतरच तयार केली जातील आणि त्याचे वितरण होईल, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांनी दिली.
यंत्रमागासाठी एकच वीजदर आवश्यक
महावितरण कंपनीच्या नवीन दरपत्रकात यंत्रमागाच्या वीज दरात वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे; पण निश्चित दरवाढीचे गणित समजत नाही. यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारीबरोबरच एकच वीज दर पाहिजे होता. त्यामुळे एकाच उद्योगात दोन दर अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आणि कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सवलतीचा एकच वीज दर ही यंत्रमाग उद्योगाची मागणी कायम असल्याचे यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन व इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितले.
छोट्या यंत्रमागधारकांच्या वीज दरात वाढ
नवीन वीज आकारानुसार २७ अश्वशक्तीपर्यंतच्या यंत्रमागांसाठी वीज दरामध्ये प्रतियुनिट ३७ पैसे वाढ झालेली आहे, तर २७ अश्वशक्तीवरील वीज दरामध्ये १३ पैसे प्रतियुनिट घट झाली आहे. ही तफावत ५० पैसे आहे.
रात्रीची वीज दर सवलत २ रुपये ५० पैशांवरून १ रुपये ५० पैसे अशी कमी करण्यात आल्याने आणखीन १२ पैसे प्रतियुनिट दरात वाढ होणार आहे. त्यामुळे २७ अश्वशक्ती आतील विजेचा दर ३ रुपये ३१ पैसे व २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागासाठी
२ रुपये ९६ पैसे राहील.
या दराच्या तफावतीमुळे २७ अश्वशक्तीखालील म्हणजे ९० टक्के छोट्या यंत्रमागधारकांवर वाढीव विजेचा बोजा पडणार आहे. तो रद्द करावा, अशी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेची मागणी आहे, असे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.
२७ अश्वशक्तीखालील अनेक यंत्रमागधारकांनी टीओडी वीज मीटर बसविले नसल्याने त्यांना रात्रीचा सवलतीचा दर मिळणार नाही. परिणामी त्यांच्या विजेच्या दरात आणखीन २२ पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे, असेही होगाडे यांनी स्पष्ट केले.