इयत्ता पाचवी, आठवीच्या प्रवेशाबाबत संभ्रमावस्था
By Admin | Updated: May 14, 2015 00:30 IST2015-05-13T21:49:47+5:302015-05-14T00:30:33+5:30
पालकांना आर्थिक भुर्दंड : दोन वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे पालक, संस्थाचालक, मुख्याध्यापकांचा गोंधळ

इयत्ता पाचवी, आठवीच्या प्रवेशाबाबत संभ्रमावस्था
अतुल आंबी - इचलकरंजी -येथील शिक्षण मंडळ व प्राथमिक शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यावरून निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेमुळे पालक, शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. या गोंधळामुळे पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण आठवीपर्यंतचे करून ज्याठिकाणी पहिली ते चौथी प्राथमिक शाळा आहे, तेथे नैसर्गिक वाढ म्हणून पाचवी व ज्याठिकाणी सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे, तेथे आठवीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. मात्र, यामध्ये पहिली ते चौथीसाठी एक किलोमीटर परिसरात, दुसरी पाचवीची शाळा असू नये, तसेच सातवीपर्यंतच्या शाळांना तीन किलोमीटर अंतरात आठवीची शाळा असू नये, अशी अटही घातली आहे. या अटीमुळे शहरातील ८५ टक्के शाळा या नियमबाह्य ठरतात. मात्र, १५ दिवसांपूर्वी येथील शिक्षण मंडळाच्यावतीने परिपत्रक काढून शहरातील सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवी वाढविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून शिक्षण मंडळ कार्यालयात देण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी धावपळ करून कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रस्ताव सादर केले.
प्रस्ताव सादर केल्यामुळे आता पाचवी व आठवीचे वर्ग आपल्याच शाळेत सुरू होणार, असे वाटून चौथी व सातवी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे दाखले संस्थेने ठेवून घेतले. काही शाळांमध्ये शिक्षण मंडळाकडून प्राप्त झालेले परिपत्रक नोटीस बोर्डावर लावून पुढील वर्ग सुरू करत असल्याची माहितीही लावण्यात आली होती. मात्र, ८ मे रोजी निकालादिवशी दुपारी बारानंतर शिक्षण मंडळाचे दुसरे परिपत्रक आले. त्यामध्ये पुढील शासन निर्णय येईपर्यंत वर्ग सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करू नये, असे कळविण्यात आले. निकाल वाटून झाल्यानंतर असे परिपत्रक हातात मिळाल्याने मुख्याध्यापक व संस्थाचालकांची भंबेरी उडाली. काही शाळांमध्ये तातडीची बैठक घेऊन याबाबत शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मात्र, पुढील वर्ग सुरू करण्यासंदर्भात कोणता निर्णय घ्यावा, याबाबत संभ्रमावस्था मात्र कायम राहिली.
आमच्याकडून कोणताही आदेश नाही : स्मिता गौड
यासंदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी स्मिता गौड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आमच्या कार्यालयाकडून कोणत्याही शाळेला नियमबाह्य पाचवी अथवा आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना अथवा प्रस्तावाची मागणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळांनी पालकांना दाखले द्यावेत. तर पाचवी व आठवीचे प्रवेश स्वीकारणाऱ्या शाळांनी रीतसर नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे म्हटले आहे.
सात हजारांपासून सुरुवात?
पाचवी व आठवीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्रतेनुसार यादीत नाव आल्यास सात हजार रुपयांपासून डोनेशन मागणीची सुरुवात केली जाते. यादीमध्ये नाव न आलेल्यांकडून दुप्पट, तिप्पट डोनेशनची मागणी केली जात आहे. अचानकपणे उडालेल्या गोंधळामुळे पालकांनाही नेमकी तक्रार करायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.