क्रॉस व्होटिंगवर विरोधकांची भिस्त

By Admin | Updated: July 9, 2015 00:41 IST2015-07-09T00:41:59+5:302015-07-09T00:41:59+5:30

बाजार समितीचे राजकारण : टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कसली कंबर

Confronted with cross-voting | क्रॉस व्होटिंगवर विरोधकांची भिस्त

क्रॉस व्होटिंगवर विरोधकांची भिस्त

राजाराम लोंढे -कोल्हापूर -बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होण्याची भीती सत्ताधारी मंडळींना आहे; तर क्रॉस व्होटिंग होऊन आपणाला संधी मिळू शकते, यावर विरोधी आघाडीची भिस्त आहे. ‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक निवडणुकीतील अनुभव सत्तारूढ गटाच्या पाठीशी असल्याने क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे.
समितीसाठी राष्ट्रवादी-जनसुराज्यची ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास,’ कॉँग्रेसप्रणीत ‘राजर्षी शाहू’ व शिवसेना-भाजपची ‘शिवशाहू शेतकरी परिवर्तन’ आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. संचालक मंडळात सर्वांत जास्त ११ जागा या विकास संस्थांच्या, तर ग्रामपंचायतीचे चार प्रतिनिधी आहेत. कार्यक्षेत्रातील साडेसहा तालुक्यांतील विकास संस्था व ग्रामपंचायतींमधील वर्चस्व पाहिले तर निकाल काय लागू शकतो, हे माहीत आहे. विकास संस्था गटात राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी व कागल तालुक्यांत राष्ट्रवादी कॉँग्रेस व जनसुराज्य या पक्षांचे वर्चस्व आहे. करवीरमध्ये कॉँग्रेसचे प्राबल्य आहे. तीच परिस्थिती ग्रामपंचायत गटांत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत करवीर वगळता उर्वरित ठिकाणी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षांनी एकतर्फी बाजी मारली. त्यामुळे कागदावरील आकडेवारी पाहता समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीचे पारडे जड दिसते; पण ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा अनुभव सत्ताधारी मंडळींच्या पाठीशी आहे. ‘गोकुळ’ निवडणुकीत सत्ताधारी गटाकडे ३२०० पैकी २४०० ठराव होते. प्रत्यक्षात चित्र वेगळेच पाहावयास मिळाले. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीतही दोन्ही कॉँग्रेस एकत्र असताना नवख्या शिवसेना-भाजपच्या उमेदवारांनी घेतलेले मतदान सत्ताधाऱ्यांची चिंता वाढविणारे होते. ठरावाच्या राजकारणात एवढे क्रॉस व्होटिंग होत असेल, तर बाजार समितीसाठी सर्व संचालकांचे मतदान आहे. त्यात पै-पाहुणा, तालुक्यातील उमेदवार असे राजकारण होत असल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होणार हे निश्चित आहे.
संस्थात्मक पातळीवरील ताकद पाहता ही निवडणूक राष्ट्रवादी आघाडी एकतर्फी जिंकू शकते; पण क्रॉस व्होटिंग झाले, तर आघाडीसमोरील अडचणी वाढू शकतात. मागील दहा वर्षांतील कारभाराबाबत राष्ट्रवादी आघाडीची प्रतिमा मलिन झाल्याने त्याचा फायदा होईल, असा कॉँग्रेस व शिवसेना-भाजप आघाडीचा दावा आहे. झालेल्या मतदानापैकी ३० टक्के मतदान क्रॉस झाले, तर राष्ट्रवादी आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे. जास्तीत जास्त मतदान हे क्रॉस व्हावे, यासाठी दोन्ही विरोधी आघाड्यांचा प्रयत्न आहे; तर क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

अडते-व्यापारी गटात धक्कादायक निकाल ?

विकास संस्था व ग्रामपंचायत गटात काय होईल, याचे आडाखे बांधले जाऊ शकतात; पण अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटांत अशी अटकळ बांधता येत नाही. अडते-व्यापारी गटात दिग्गज रिंगणात असून विविध विभाग व त्या अंतर्गत राजकारणावर येथील जय-पराजय अवलंबून आहे. हमाल-तोलाईदार गटात बरीच वर्षे तोलाईदारांनीच प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी हमालांच्या प्रतिनिधींनी आव्हान उभे केल्याने येथेही धक्कादायक निकाल लागू शकतो.

Web Title: Confronted with cross-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.