संविधानावरील विश्वास अढळच...
By Admin | Updated: November 25, 2014 23:49 IST2014-11-25T23:25:58+5:302014-11-25T23:49:20+5:30
संविधानदिन विशेष : संविधानाच्या आवृत्तीस भरघोस प्रतिसाद

संविधानावरील विश्वास अढळच...
संदीप खवळे - कोल्हापूर -भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमांमुळे निर्माण झालेल्या भारतीय संविधानाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधक विद्यार्थी, चळवळीतील कार्यकर्ते आणि पुरोगामी राजकारण्यांचा संविधानावरील विश्वास अढळ असल्याचे द्योतक संविधान प्रतींच्या खरेदीतून दिसून येते.
संविधानाची २६ जानेवारी २०१४ पर्यंतच्या दुरुस्त्यांचा समावेश असलेली सुधारित आवृत्ती आता इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये येथील शासकीय मुद्रणालयामध्ये उपलब्ध आहे. यापूर्वी संविधान केवळ मराठीमध्येच उपलब्ध होते. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांत सुधारित आवृत्तीच्या २५ प्रती विकल्या गेल्या आहेत.
घटनाकारांनी तीन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर मसुदा तयार करून २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकृत केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि संशोधक विद्यार्थी यांच्यासाठी पूर्वीच्या तुलनेत अधिक सोप्या भाषेतील संविधान उपलब्ध करून देण्यात आले आहे. देशातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर दलित चळवळीबरोबरच इतर पुरोगामी चळवळींनाही आता संविधानाचा अभ्यास पूर्वीपेक्षा जास्त सकसपणे करावा लागणार आहे, अशा भावना येथे येणाऱ्या वाचकांकडून ऐकावयास मिळतात. संविधानाची सुधारित आवृत्ती गेल्या तीन महिन्यांपासून येथे उपलब्ध आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे ८० प्रती विकल्या गेल्या आहेत.
एकीकडे संविधानाकडे सर्व स्तरांतील वाचकांचा कल वाढत असताना, डॉ. आंबेडकरांच्या अन्य साहित्याची हेळसांड मात्र शासनाकडूनच सुरू आहे. कोल्हापूर येथील शासकीय मुद्रणालयामध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रग्रंथ गेली पाच वर्षे उपलब्ध नाहीत. मराठीमध्ये असलेल्या चरित्रग्रंथाची छपाई २००८-०९ मध्ये तैवानमध्ये करण्यात आली होती.
या चरित्रग्रंथात आंबेडकरांची दुर्मीळ छायाचित्रे असल्यामुळे आंबेडकरप्रेमींकडून या ग्रंथाला प्रचंड मागणी आहे; पण हा ग्रंथच उपलब्ध नाही.
डॉ. आंबेडकरांचे विविध विषयांवरील लेखन व त्यांची संसदेतील भाषणे २२ खंडांमध्ये शासनाने प्रकाशित केली आहेत. यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेविषयीचे १९ आणि २० हे खंड सोडले, तर अन्य कोणताही खंड मराठीमध्ये उपलब्ध नाही. हे खंड मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी सातत्याने करूनही शासन हे ग्रंथ मराठीत प्रकाशित का करीत नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
‘बहिष्कृत भारत’ गेले सहा महिने उपलब्ध नाही. शाहू चरित्रग्रंथ, महात्मा फुले समग्र वाङ्मय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच अण्णा भाऊ साठे समग्र वाङ्मयही उपलब्ध नाही. शाहू, फुले, आंबेडकरी चळवळींचे साहित्य मोडीत काढण्याचा घाटच सरकारने घातला आहे की काय, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर भारतीय संविधान निर्माण झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच त्यांना ‘घटनेचे शिल्पकार’ म्हणून संबोधले जाते.
भारतीय संविधान एक दृष्टिक्षेप
घटना समितीने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान स्वीकृत केले.
संसदीय लोकशाही, संघराज्यीय, स्वतंत्र न्यायव्यवस्था, सार्वत्रिक प्र्रौढ मताधिकार, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, स्वतंत्र संस्था वा मंडळे, कल्याणकारी तत्त्वज्ञान ही प्रमुख वैशिष्ट्ये
३९५ कलमे, १२ परिशिष्टे आणि २२ विभाग
जनता हीच सार्वभौम