जैव कचऱ्यावरून वाद पेटला
By Admin | Updated: July 16, 2014 01:00 IST2014-07-16T00:48:17+5:302014-07-16T01:00:32+5:30
वैद्यकीय संघटना : दराबाबत ठेकेदाराची मनमानी खपवून घेणार नाही

जैव कचऱ्यावरून वाद पेटला
कोल्हापूर : शहरातील जैव वैद्यकीय कचरा ‘बीएमडब्ल्यू’(बायो मेडिकल वेस्ट)ची विल्हेवाट लावण्यावरून नेचर अँड नीड बीएमडब्ल्यूटी सर्व्हिसेस आणि डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्यात वाढीव दरावरून वाद सुरू झाला आहे. ‘नेचर’चा ठेका रद्द करण्यात आला असतानाही दहा टक्के दंड लावून बिले दिली जात आहेत. पूर्वीच्या दराप्रमाणे पैसे देण्यावर संघटना ठाम असून, या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने हस्तक्षेप करण्याची मागणी असो.च्या पदाधिकाऱ्यांच्या आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
‘नेचर’च्या अंतर्गत भागीदारांत वांदे व भरमसाठ दरवाढ यामुळे आलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने ठेका रद्दचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या सूचनेनुसार दुसरी व्यवस्था होईपर्यंत ‘नेचर’कडूनच रुग्णालयांतील कचऱ्याचा उठाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाढीव बिलामुळे जैव कचरा उठाव ठप्प आहे. कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास रुग्णालयांना कारवाईची भीती सतावत आहे. अशा परिस्थितीत महापालिका किंवा प्रदूषण मंडळाने विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)