उपसा बंदीमुळे मोटारपंपांना सक्तीची विश्रांती

By Admin | Updated: January 13, 2016 01:13 IST2016-01-13T00:56:20+5:302016-01-13T01:13:45+5:30

पाणी जपून वापरावे लागणार : वीस वर्षांनंतर प्रथमच भोगावती नदीतून पाणी उपसा बंदी, नदीपात्र अनेक ठिकाणी कोरडे

Compulsory rest for motorpumps due to restriction of Loss | उपसा बंदीमुळे मोटारपंपांना सक्तीची विश्रांती

उपसा बंदीमुळे मोटारपंपांना सक्तीची विश्रांती

संजय पारकर - राधानगरीशेतीसाठी पाहिजे तेव्हा व मुबलक पाणी मिळत असल्यामुळे निर्धास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना २० वर्षांनंतर प्रथमच भोगावती नदीतून पाणी उपसाबंदीला सामोरे जावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी उपसा व बंदी कालावधीचे वेळापत्रक जाहीर करून त्याची अंमलबजावणी सरू केली आहे. त्यामुळे नदीवरील मोटारपंपाना सक्तीची विश्रांती मिळाली आहे. नदीत पाणी सोडण्याचे प्रमाणही कमी केल्याने काही ठिकाणी नदी कोरडी पडली आहे.निसर्गाची कृपा, शाहू महाराजांनी बांधलेले धरण यामुळे राधानगरी ते कोल्हापूरपर्यंत भोगावती नदीकाठ समृद्ध झाला. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले, साखर कारखान्यांसह उद्योगधंदे झाले. १९५४ पासून राधानगरी धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर जसजसा पाण्यचा वापर वाढला तसा दरवर्षी एप्रिल-मेमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. १९८० च्या दशकात त्याची तीव्रता वाढली. याकाळात या नदीवर पाणी उपसण्याचे वेळापत्रक होते. त्या काळात डिझेलची इंजिन होती. पाटबंधारे विभाग त्यावर सील करीत असे. या काळात धरणातील उपलब्ध पाणी व इचलकरंजीपर्यंतची मागणी याचा मेळ घालताना यंत्रणेची मोठी
धावपळ होत होती. धरणातून पाणी सोडणे बंद असलेल्या काळात नदी पूर्णपणे कोरडी पडलेली असायची तेव्हा नदीत खड्डे काढून पिण्यासाठी व जनावरांच्या पाण्याची सोय करावी लागत होती.
मार्च १९९७ मध्ये काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून गैबी बोगद्याद्वारे भोगावती नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भोगावती नदीकाठावर पाणी पुरविण्याचा राधानगरी धरणावरील ताण पूर्णपणे कमी झाला.
तेव्हापासून ही नदी अपवाद वगळता बाराही महिने दुथडी भरून वाहत होती. परिणामी, येथे पाणी उपस्यावर कसलेही निर्बंध नव्हते. बेसुमार
पाणी उपसण्याची सवय लागल्यामुळे आताची पाणी उपसा बंदी लोकांच्या पचनी पडणे अवघड जात आहे.
मात्र, निसर्गाचे बदलेले स्वरूप पहाता यापुढील काळात पावसाचे
प्रमाण कमी होण्याचा धोका असल्याने पाणी वापराबाबत लोकांनी जागरूक होणे काळाची गरज बनली आहे.


पाणीटंचाईमुळे कारखान्यांनी उसाची उचल त्वरित करावी
सावरवाडी : दुष्काळामुळे ऊस पिकाच्या उत्पादनात घट जाणवू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नदीपात्रातील पाणी उपसाबंदी जाहीर झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान होणार आहे. साखर कारखान्यांनी चालू ऊस गळीत हंगामातील उसाची लवकर उचल करावी, अशी मागणी ‘गोकुळ’चे संचालक सत्यजित पाटील (कसबा बीड) यांनी केली आहे.
यंदा उसाच्या उत्पादनाबरोबर उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी वेळेवर मिळणार नाही. त्यामुळे ऊस पिकांचे नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप क्षमता वाढविली असून, लाभ क्षेत्रातील उसाची उचल त्वरित करणे गरजेचे आहे. उसाच्या वजनातील घट टाळण्यासाठी उसाची उचल त्वरित करण्याची मागणी करून पाटील यांनी म्हटले आहे की, ऊस पिकांना पाणी वेळेत मिळणार नाही. त्यामुळे ऊस लागणी क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात घट जाणवत आहे.
साखर कारखान्यांचा सध्याचा गाळप हंगाम उसाच्या तोडण्या मंद गतीने सुरू असल्यामुळे लांबण्याची शक्यता आहे. एकीकडे उसाची उचल वेळेत होणार नाही, तर दुसरीकडे पिकांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Compulsory rest for motorpumps due to restriction of Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.