संकुचित वृत्तीमुळे देशाची एकात्मता धोक्यात : न्या. हेमंत गोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:05 IST2019-12-14T16:02:41+5:302019-12-14T16:05:26+5:30
जाती धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात संकुचितपणा वाढत चालला आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे, अशी चिंता निवृत्त न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली.

संकुचित वृत्तीमुळे देशाची एकात्मता धोक्यात : न्या. हेमंत गोखले
कोल्हापूर: जाती धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात संकुचितपणा वाढत चालला आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे, अशी चिंता निवृत्त न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली. अल्पसंख्याकामध्ये भीतीचे वातावरण असून जगण्यापेक्षा मोठे होत चालेल्या धर्माच्या प्रश्नांचा देशाच्या प्रगतीवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठा गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या हमीद दलवाई साहित्य व समाजकार्य या विषयावरील चर्चासत्राचा समारोप शनिवारी गोखले यांच्या मार्गदर्शनाने झाला. साहित्यीक सदानंद मोरे, राजन गवस, विनोद शिरसाठ, विनय हर्डीकर, रणधीर शिंदे प्रमुख उपस्थित होते.
समारोपाच्या पहिल्या सत्रात दलवाईच्या लेखनाचे अनुवाद व नव्या पिढीचे मनोगत यावर चर्चासत्र झाले. गौरी पटवर्धन व दिपाली अवकाळे यांनी दलवाईच्या साहित्याचे अनुवाद करताना येणारे अनुभव कथन केले. नव्या पिढीचे मनोगत समीर शेख, हिना कौसरखान, अझरुद्दीन पटेल यांनी मांडले. दलवाई आजच्या पिढीने अभ्यासावा, अंगीकारावा असे व्यक्तीमत्व असल्याच्या भावना त्यांनी मांडल्या.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य सुनिलकुमार लवटे यांनी दलवार्इंचे साहित्य सर्व भाषामध्ये प्रकाशित होण्याची गरज मांडली. दलवार्इंचा विचार मुस्लिम म्हणून न करता मानवतावादी भारतीय असे करणे हीच त्यांच्या कार्याला पोहचपावती ठरेल असे सांगितले.