पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:53+5:302021-08-15T04:25:53+5:30
गांधीनगर : पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. ...

पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करा
गांधीनगर : पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. ते करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते. महापुरामुळे नदी काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. वळीवडे, चिंचवाड, वसगडे या गावातील जवळजवळ ९०० हेक्टर शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले. या क्षेत्रातील शेती, घरे अक्षरश: पाण्यात होती. या सर्व पूरबाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. गावातील जेवढी घरे पाण्याखाली होती, त्यांचे संपूर्ण पुनर्वसन व मदत करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सतेज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी पाटील यांनी रूकडी बंधाऱ्याला भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. तसेच भविष्यात या बंधाऱ्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण होणार नाही, असे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, वळीवडे गावातील नागझरी या परिसराची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पालकमंत्र्यांना सांगितल्या. वसगडेमध्ये पडझड झालेल्या घरांची तसेच शेती परिसराची पाहणी करून तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राज्य सरकार पूरबाधितांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा विश्वासही पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी जि. प. सदस्या वंदना पाटील, पं. स. सदस्य प्रदीप झांबरे, शोभा राजमाने, वळीवडे सरपंच अनिल पंढरे, चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, वसगडेचे सरपंच नेमगोंडा पाटील, प्रांत अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, शिवाजी इंगवले, सर्कल अर्चना गुळवणी, सचिन चौगुले, चंद्रकांत पाटील, डॉ. श्रीकांत चौगुले, प्रकाश शिंदे, विजय पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, रावसाहेब पाटील, दीपक पासाना, बली खांडेकर, भगवान पळसे उपस्थित होते.
फोटो : १४ करवीर सतेज पाटील
करवीर तालुक्यातील वळीवडे, चिंचवाड, वसगडे या पूरबाधित गावांची पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी पाहणी केली. (छाया - बाबासाहेब नेर्ले.)