पंधरा दिवसात ऑडिट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:41+5:302021-02-05T07:13:41+5:30
कोल्हापूर : संभाजीनगरातील रेसकोर्स येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या आतापर्यंत झालेल्या बांधकामाबाबतचे ऑडिट येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून त्याचा अहवाल ...

पंधरा दिवसात ऑडिट पूर्ण करा
कोल्हापूर : संभाजीनगरातील रेसकोर्स येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या आतापर्यंत झालेल्या बांधकामाबाबतचे ऑडिट येत्या पंधरा दिवसात पूर्ण करून त्याचा अहवाल माझ्याकडे द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी क्रीडा उपसंचालकांना दिले. याप्रश्नी जिल्हाधिकारी देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस क्रीडा सेलच्यावतीने सोमवारी निवेदन देण्यात आले होते.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवा संचालनालयातर्फे पाच जिल्ह्यांसाठी कोल्हापुरातील रेसकोर्स येथे विभागीय क्रीडा संकुल २००४ साली मंजूर झाले. प्रत्यक्षात २००९ पासून कामास सुरुवात झाली. मात्र, अजूनही ते पूर्ण झालेले नाही. यात तीन कोटी ७२ लाख ६७ हजार २६४ रुपये खर्चून जलतरण तलाव बांधला. मात्र, तो पोहण्यायोग्य नसून बंद अवस्थेत आहे. दुसरा जलतरण तलाव बांधण्याचा घाट घातला जात आहे. आदीच्या खर्चाची जबाबदारी निश्चत करावी. आदी मागण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रीडा सेलच्यावतीने याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालकांसोबत चर्चेसाठी बैठक घेण्याबाबत जिल्हाधिकारी देसाई यांना विनंती केली होती. त्यानुसार सोमवारी याबाबतची बैठक झाली. यात जिल्हाधिकारी देसाई यांनी येत्या पंधरा दिवसात क्रीडा संकुलाच्या बांधकामाबाबतचे ऑडिट करून त्याचा अहवाल देण्यास सांगितले. त्यानंतर ते या संकुलाची पाहणी करणार आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत क्रीडा उपसंचालक माणिकराव ठोसरे, जिल्हा क्रीडा अधिकारी डाॅ. चंद्रशेखर साखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर.के. पोवार, क्रीडा सेलचे सुहास साळोखे, संजय कुराडे, संजय पडवळे, रियाज कागदी, उत्तम कोराणे, निरंजन कदम, अभिषेक शिंदे, चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.