गुजरीतील नावाजलेल्या पेढीकडून दागिने मिळत नसल्याच्या तक्रारी; नागरिक हेलपाटे मारून बेजार : काही कोटींचे दागिने अडकल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:23 IST2021-02-14T04:23:31+5:302021-02-14T04:23:31+5:30
कोल्हापूर : येथील गुजरीतील सुमारे सत्तर वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहिलेल्या सराफ पेढीकडून गेल्या काही दिवसांपासून लोकांचे दागिने परत ...

गुजरीतील नावाजलेल्या पेढीकडून दागिने मिळत नसल्याच्या तक्रारी; नागरिक हेलपाटे मारून बेजार : काही कोटींचे दागिने अडकल्याची भीती
कोल्हापूर : येथील गुजरीतील सुमारे सत्तर वर्षे ग्राहकांच्या विश्वासास पात्र राहिलेल्या सराफ पेढीकडून गेल्या काही दिवसांपासून लोकांचे दागिने परत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दागिने दिलेले लोक रोज हेलपाटे मारत आहेत; परंतु त्यांना नवे वायदे दिले जात आहेत. दागिन्यांची एकत्रित रक्कम काही कोटींमध्ये असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे या पेढीबद्दलच्या लोकांच्या मनातील विश्वासार्हतेलाच तडा गेला आहे.
घरात कोणतेही कार्य असो, उसाची बिले आली किंवा अन्य कशातून चार पैसे हातात आले की शेतकरी माणूस ते घेऊन गुजरीत ही पेढी गाठत असे. अतिशय चोख सोने मिळण्याची खात्री असल्याने अशी कित्येक कुटुंबे आहेत की त्यांच्या तीन-तीन पिढ्या या पेढीशी जोडल्या आहेत. मुख्यत: कोल्हापूरच्या पश्चिमेकडील गावे व त्यातही करवीर तालुक्यातील अनेक गावेच्या गावे या पेढीत व्यवहार करत आले आहेत. जुन्या दुकानाच्या ठिकाणी व्यापारी संकुल झाल्यावर नवे तितकेच चांगली पेढी दुसरीकडे नवीन वास्तूत सजली. सणासुदीच्या काळात तर तिथे श्वास घ्यायला मिळायचा नाही इतकी गर्दी असे. लोकांनी दागिने करून नेले आणि त्याचे पैसे वर्षाने कधीतरी लोक त्यांना द्यायचे. त्यांचीही कधी तक्रार नसे. त्यामुळे एकमेकांवरील विश्वास हीच तिथे पावती असे. या पेढीच्या मालकांचे अनेक ग्राहक कुटुंबांशी तर कौटुंबिक संबंध तयार झाले होते. आजही अशी अनेक कुटुंबे आहेत, त्यांनी या पेढीतील व्यवहाराबाबत तक्रारी झाल्यावर सोने खरेदी करण्यासाठी अन्य दुकानात अजून पाऊल ठेवलेला नाही. इतकी विश्वासार्हता पाठीशी असताना सध्या येत असलेला अनुभव चीड आणणारा आहे.
एका महिलेने चार तोळ्यांचे मंगळसुत्र दुरुस्तीसाठी दिले. त्यांनी पावती दिली, आठ दिवसांत देतो म्हणून सांगितले; परंतु तीन महिने हेलपाटे मारले तरी मंगळसूत्र द्यायचे नाव ते घेईनात. चुकून दुसऱ्यांना बदलून दिले आहे, आज देतो - उद्या देतो असे वायदे रोज दिले गेेले. शेवटी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनाच फोन करायला लावल्यावर ते मंगळसूत्र परत मिळाले. अन्य एका ग्राहकाने घरात लग्न कार्य असल्याने दुरुस्तीसाठी १६ तोळे दागिने दिले. त्यांनाही असाच अनुभव आला. त्यांनीही दबाव टाकून हे दागिने कसेबसे परत मिळविले. अन्य एका ग्राहकालाही असाच अनुभव आला. त्यांनी पोलिसांत तोंडी तक्रार दिल्यावर पेढीच्या मालकाने चेक दिला; परंतु तो बँकेत वठलाच नाही. त्यांनी खटला दाखल करतो म्हटल्यावर पैसे मिळाले. करवीर तालुक्यातील एका गावातील महिलेने दागिने व तीन लाख रुपये या पेढीत ठेवले. रकमेचे काही दिवस व्याज दिले गेले; परंतु आता व्याजही नाही, मूळ रक्कमही नाही आणि सोने द्यायचे तर नावच काढायला तयार नाहीत. त्या कुटुंबातील लोक फोन करून व दुकानात जाऊन थकले आहेत. त्यांना आजही पैसे व दागिनेही मिळालेले नाहीत.
दुकानाची गेली रया..
दागिन्याबाबत असा अनुभव येऊ लागल्याने ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. एकेकाळी दागिन्यांनी भरलेले दुकान आता रिकामे झाले आहे. लोक दागिने परत मागतात म्हणून त्यांनीच दागिने कमी ठेवले आहेत का, अशीही चर्चा ग्राहकांत आहे.
नोटाबंदीनंतरच असा अनुभव
नोटाबंदीनंतरच या पेढीकडून असा अनुभव सुरू झाल्याचे काही ग्राहकांचे म्हणणे आहे. माझ्यावर इन्कम टॅक्सचा छापा पडल्याने सगळ्या वह्या त्यांच्याकडे अडकल्या आहेत. त्या परत मिळाल्या की दागिने परत करतो, असेही कारण पेढीकडून दिले जात आहे. त्यात कितपत तथ्य असेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
अशीही अडचण
या पेढीकडे अनेक ग्राहकांनी विश्वासाने दागिने दिले आहेत, पैसे दिले आहेत. दागिने गहाणवट ठेवून पैसे नेणाऱ्या ग्राहकांची संख्याही प्रचंड आहे. त्यातील अनेकांकडे पावत्याच नाहीत. त्यामुळे त्यांना तक्रार करण्यासही मर्यादा येत आहेत. कोण पोलिसांत जातो म्हणाले तर हे पेढी मालक माझेही फार वरपर्यंत संबंध आहेत असे प्रत्युतर आता ग्राहकांना देत आहेत.