कोल्हापूर : नांदणी येथील हत्तीचे गुजरातमधील वनतारा पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केल्यानंतर या निर्णयाला विरोध करणाऱ्या कोल्हापूरकरांबद्दल मुंबईतील हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठक याने सोशल मीडियात कोल्हापूरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याबाबत संतोष घोलप (सध्या रा. मुंबई, मूळ रा. कोल्हापूर) यांनी कोल्हापूर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) घोलप यांचा जबाब नोंदवला.सायबर पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, अर्जदार संतोष घोलप यांनी ईमेलद्वारे हिंदुस्थानी भाऊ याच्या विरोधात तक्रार दिली होती. 'नांदणी येथील मठाच्या हत्तीचे स्थलांतर केल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ याने सोशल मीडियात पोस्ट व्हायरल करून कोल्हापूरकरांची बदनामी केली. अपमानास्पद भाषा वापरून जातीद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच त्याचे सोशल मीडिया अकौंट बंद करावे,' अशी मागणी अर्जदार घोलप यांनी केली आहे. पोलिसांनी घोलप यांचा जबाब गुरुवारी नोंदवला. हिंदुस्थानी भाऊ याला नोटीस पाठवून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.