आयुक्तांचे ‘मिशन हॉलिडे’
By Admin | Updated: February 23, 2015 00:29 IST2015-02-23T00:27:28+5:302015-02-23T00:29:05+5:30
सुटीदिवशी झाडाझडती : झूम, एसटीपी, पंचगंगेसह रस्त्यांची पाहणी

आयुक्तांचे ‘मिशन हॉलिडे’
कोल्हापूर : महापालिक ा आयुक्त पी. शिवशंकर यांनी लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी), टाकाळा खण, पंचगंगा घाट, स्मशानभूमी आदी परिसराची रविवारी सुटीच्या दिवशी पाहणी केली. एसटीपी पाईपलाईन, टाकाळा खणीत झूम येथील प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास अग्रक्रम द्या, रखडलेले सर्वच प्रकल्प पावसाळ्यापूर्वी जलद गतीने हालचाल करत मार्गी लावा, असे आदेश दिले. सुटीच्या दिवशी आयुक्तांनी अचानक झाडाझडती घेतल्याने प्रशासनात खळबळ उडाली. रविवारची सुटी असूनही सकाळी अकरा वाजल्यापासून आयुक्त पी. शिवशंकर यांनी पाहणी सुरू केली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील व आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते. पंचगंगा स्मशानभूमीत ‘बेड’ची संख्या कमी आहे. ती वाढविण्याबाबत नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या. केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करून येत्या दोन महिन्यांत ही कामे मार्गी लावण्याबाबत काय करता येईल, याबाबत ठेकेदार व अधिकाऱ्यांशी आयुक्तांनी चर्चा केली. दुपारी आयुक्त झूम प्रकल्पावर पोहोचले. नागरिकांनी झूममधील कचरा पेटविल्याने होणाऱ्या त्रासाबद्दल गाऱ्हाणी मांडली. कचरा उठाव कधी करायचा तेव्हा करा, मात्र कचरा पेटविणे किमान थांबवा, अशी विनंती नागरिकांनी केली.
(प्रतिनिधी)
आयुक्तांचा दणका...
आयुक्तांनी केलेल्या झाडाझडतीमुळे भेदरलेल्या आरोग्य विभागाने तत्काळ नागरिकांसाठी जाहीर आवाहन प्रसिद्धीस दिले. यामध्ये पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, कोटीतीर्थ तलाव, रंकाळा, आदी ठिकाणी प्रदूषण होणार नाही,
याची नागरिकांनी काळजी घ्यावी. धुणी धुण्यासाठी रंकाळा धुण्याची चावी, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क, बेलबाग, आदी ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली आहे, याचा वापर करावा. नदी प्रदूषणास जबाबदार असलेल्या नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जाग्यावर आदेश...
पंचगंगा व राजाराम बंधारा येथे धुण्याची स्वतंत्र व्यवस्था करा.
नदीत दूषित पाणी किंवा कचरा थेट टाकणाऱ्यांवर कारवाई करा
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी रोखण्याबाबत ड्रेनेज विभागाने तत्काळ अंमलबजावणी करावी.
टाकाळा खणीचे काम मार्चअखेर पूर्ण करा.
झूम प्रकल्प येथे वीजनिर्मिती प्रकल्पास जागा उपलब्ध करा.
झूम प्रकल्पातील प्रक्रिया केलेला कचरा टाकाळा खणीत टाकण्याचे मार्चअखेर नियोजन झालेच पाहिजे.
स्मशानभूमीच्या नुतनीकरणाचा स्वतंत्र आराखडा करा.
केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान दुरुस्ती महिन्यात मार्गी लावा.एसटीपी प्रकल्पाच्या खुदाई कामासाठी महापालिकेतर्फे आणखी एक पोकलॅन मशीन लावा, त्याचे पैसे ठेकेदाराच्या बिलातून घ्या पण, काम पंधरा दिवसात पूर्ण करा.