राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:17+5:302021-05-07T04:25:17+5:30
कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या ९९ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी समाजाने शाहूंना अभिवादन करून त्यांच्या लोकोत्तर ...

राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षास प्रारंभ
कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या ९९ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी समाजाने शाहूंना अभिवादन करून त्यांच्या लोकोत्तर कार्याचा गजर केला. कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम करता आले नसले, तरी मनामनांत मात्र स्मृतिज्योत तेवत राहिली. हे वर्ष शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दसरा चौक व शाहू स्मारक भवन येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहू स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे, युवराज कदम, अवधूत पाटील उपस्थित होते. याशिवाय शहरातील विविध संस्था, संघटनांच्यावतीनेदेखील शाहू समाधी स्मारक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले.
शाहू महाराजांना जवळून अनुभवलेले, त्यांना पाहिलेले गंगाधर यशवंत पोळ यांनी शाहूंच्या निधनानंतरच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. इतिहास संशोधक डॉ. देविकाराणी पाटील यांनी ही सगळी माहिती फेसबुक पेजवर दिली. सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने जाहीर कार्यक्रमांना व लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असल्याने अनेक नागरिकांनी व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवून, फेसबुकवर त्यांनी केलेल्या कार्याची माहिती देऊन व आजच्या संदर्भाने महाराज कसे कालातीत आहेत, याची माहिती देत त्यांना मुजरा केला.
---
फोटो नं ०६०५२०२१-कोल-शाहू अभिवादन०१,
ओळ : राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरूवारी कोल्हापुरातील दसरा चौकातील शाहूंच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी वसंतराव मुळीक उपस्थित होते.
--