संगीत-चित्रशिल्पकृतींनी रंगली मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:02+5:302021-01-18T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शास्त्रीय संगीताचा स्वर, तान आलापांनी घेतलेला मनाचा ठाव आणि निसर्गचित्र, अमूर्त निसर्गचित्र, शिल्पांच्या ...

संगीत-चित्रशिल्पकृतींनी रंगली मैफल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शास्त्रीय संगीताचा स्वर, तान आलापांनी घेतलेला मनाचा ठाव आणि निसर्गचित्र, अमूर्त निसर्गचित्र, शिल्पांच्या माध्यमातून कलेचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करत रविवारी रंगसुरांची मैफल रंगली.
दरवर्षी टाऊन हाॅलच्या बागेत रंगणारी हा मैफल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र ऑनलाईन सादर करण्यात आली. यावेळी कलाशिक्षिका डॉ. नलिनी भागवत यांना ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्याहस्ते रंगबहार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर, विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी जानेवारी महिन्यातील रविवारी ही मैफल आयोजित केली जाते. दरवर्षी टाऊन हॉलच्या निसर्गरम्य बागेत मान्यवरांच्या व रसिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष धनंजय जाधव, इंद्रजित नागेशकर, कार्यवाह संजीव संकपाळ उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, कलाकारांनी आपल्याभोवती, समाजात घडत असलेल्या बदलांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास करून त्याचे प्रतिबिंब कलेच्या माध्यमातून उमटवले पाहिजे. कला ही जशी मनोरंजनाची बाब आहे, तशीच ती सामाजिक स्थित्यंतरांचीही साक्षीदार असल्याने कलाकाराने कलाकृतीतून व्यक्त झाले पाहिजे.
डॉ. नलिनी भागवत यांनी त्यांचा कलाप्रवास उलगडला. यानंतर गायक मधुसूदन शिखरे यांनी सूर आळवत मैफलीला सुरुवात केली. त्यांनी ‘मिया की तोडी’ या प्रभातकालीन रागातील तीन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ‘भीमपलास’ रागातील तीन रचना सादर केल्या. त्यांना निखिलेश शिखरे (तबला), मयुरेश शिखरे (हार्मोनियम), निनाद खाडिलकर (तानपुरा) यांची साथ होती.
दुसरीकडे चित्रकार-शिल्पकार कलाकृती साकारू लागले. ज्येष्ठ चित्रकार व माजी प्राचार्य जी. एस. माजगावकर यांनी रंगरेषांच्या माध्यमातून कॅनव्हासवर निसर्गचित्र, तर चित्रकर्ती माजी प्राचार्या अस्मिता जगताप यांनी अमूर्त शैलीतील निसर्गचित्र साकारले. शिल्पकार संजीव संकपाळ यांनी रा. शि. गोसावी कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांचे शिल्प साकारले.
कार्यक्रमाला सुहासिनी जाधव, प्राचार्य अजेय दळवी, रियाज शेख, विलास बकरे, विजय टिपुगडे, अमृत पाटील, किशोर पुरेकर, उज्ज्वल दिवाण, पार्श्वनाथ नांद्रे, प्रशांत जाधव, एस. निंबाळकर, अतुल डाके, सुरेश मिरजकर, मनोज दरेकर, मानसिंग टाकळे उपस्थित होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी स्वागत केले.
--
फोटो नं १७०१२०२१-कोल-रंगबहार०१
ओळ : कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रात रविवारी रंगबहार संस्थेच्यावतीने आयोजित मैफल रंगसुरांची या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकर्ती नलिनी भागवत यांना डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अमृत पाटील, विजय टिपुगडे, धनंजय जाधव, इंद्रजित नागेशकर, व्ही. बी. पाटील, संजीव संकपाळ, प्राचार्य अजेय दळवी आदी उपस्थित होते.
--
०२
यावेळी अस्मिती जगताप यांनी अमूर्त शैलीतील चित्र साकारले.
--
०३
ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांनी निसर्गचित्र साकारले.
--
०४
गायक मधुसूदन शिखरे यांचे शास्त्रीय गायन झाले.
--
०५
शिल्पकार संजीव संकपाळ यांनी ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत जोशी यांचे शिल्प साकारले.
--