Kolhapur- सीएचबीधारकांचे दुखणे: 'सेवा' नव्हे, 'मेवा' देणाऱ्याला प्राधान्य

By पोपट केशव पवार | Updated: December 27, 2024 15:54 IST2024-12-27T15:54:10+5:302024-12-27T15:54:40+5:30

पोपट पवार कोल्हापूर : एका-एका संस्थेत अकरा-अकरा वर्षे सीएचबीवर सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अनेक तरुणांना ऐनवेळी संस्थाचालकांनी डावलून ...

College professors who have been working on CHB for many years are not given an opportunity during recruitment | Kolhapur- सीएचबीधारकांचे दुखणे: 'सेवा' नव्हे, 'मेवा' देणाऱ्याला प्राधान्य

Kolhapur- सीएचबीधारकांचे दुखणे: 'सेवा' नव्हे, 'मेवा' देणाऱ्याला प्राधान्य

पोपट पवार

कोल्हापूर : एका-एका संस्थेत अकरा-अकरा वर्षे सीएचबीवर सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या अनेक तरुणांना ऐनवेळी संस्थाचालकांनी डावलून 'लाखमोला'चे गणित साधत दुसऱ्यांनाच संधी दिल्याने सीएचबीधारक तरुणांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे.

एकाच संस्थेत काही वर्षे काम केले तर भरतीवेळी संधी मिळेल, ही भाबडी आशा बाळगून असणाऱ्या तरुणांची संस्थाचालकांनी अक्षरश: माती केली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अशा अनेक महाविद्यालयांमध्ये एक तपाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या तरुणांना डावलून संस्थाचालक जवळच्या तरुणांवर माया दाखवत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे संस्थाचालकांचा पाहुणा असेल किंवा माया देण्याची क्षमता असेल अशांनाच पूर्णवेळ सहायक प्राध्यापक होता येईल. ज्यांची आर्थिक क्षमता नसेल त्यांनी मात्र, आयुष्यभर सीएचबीधारक सहायक प्राध्यापक म्हणूनच राहायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे २०१७ मध्ये रिक्त झालेल्या जागा अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेल्या नाहीत. महाविद्यालयीन पातळीवर राबविलेल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेतील वशिलेबाजी यामुळे सीएचबीधारक सहायक प्राध्यापकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.

'सेवा' नव्हे, 'मेवा' देणाऱ्याला प्राधान्य

कोराेनाकाळात एका संस्थाचालकाची सीएचबीवर काम करणाऱ्या एका प्राध्यापकाने अक्षरश: जिवापाड सेवा केली. त्याच्या घरातील कामे करण्यासोबतच संस्थाचालकाला कोरोना होऊ नये म्हणून कमालीची काळजी घेतली. ‘या काळात केलेले उपकार मी कधीच विसरणार नाही,’ असे तो संस्थाचालक बोलून दाखवायचा. मात्र, सहायक प्राध्यापकाच्या भरतीवेळी मात्र, ही 'सेवा' विसरून त्याने 'मेवा' देणाऱ्यांनाच प्राधान्य दिले.

'राजाराम'मध्ये अर्धा स्टाफ सीएचबीधारक

शासकीय राजाराम महाविद्यालयात जवळपास ५०हून अधिक सहायक प्राध्यापक हे सीएचबीवर काम करीत आहेत. राज्यातील शासकीय महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातात. गतवर्षी या महाविद्यालयांमधील रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र, ही पदे अद्यापही भरलेली नाहीत.

७२ जागांसाठी ६ हजारांहून अधिक अर्ज

शिवाजी विद्यापीठ अधिविभागातील सहायक प्राध्यापकांच्या ७२ जागांसाठी तब्बल १२ वर्षांनंतर जाहिरात निघाली. या भरतीकडे तिन्ही जिल्ह्यांतील पात्रताधारक विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, याची प्रक्रिया सुरू असतानाच कुलपतींनी या भरतीला स्थगिती दिली. विशेष म्हणजे ७२ जागांसाठी सहा हजारांहून अधिक अर्ज आल्याचे समजते.

Web Title: College professors who have been working on CHB for many years are not given an opportunity during recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.