Coffin facility in Savitribai will take three more coffins: Deshmukh | ‘सावित्रीबाई’मध्ये शवपेटीची सुविधा, आणखी तीन शवपेट्या घेणार : देशमुख

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात बसविण्यात आलेल्या शीत शवपेटीचे उद्घाटन गुरुवारी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, सचिन पाटील, संजय मोहिते, मधुकर रामाणे, दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, माधुरी लाड, प्रतिज्ञा उत्तुरे उपस्थित होते.

ठळक मुद्दे‘सावित्रीबाई’मध्ये शवपेटीची सुविधाआणखी तीन शवपेट्या घेणार : देशमुख

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीत शवपेटीची सुविधा उपलब्ध करून दिली असून तिचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. अशा प्रकारच्या अजून तीन शीत शवपेट्या घेतल्या जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिली.

एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत झाली आणि काही कारणाने एक-दोन दिवस मृतदेह ठेवायचा प्रसंग आला तर नातेवाइकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने चार शीत शवपेट्या घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांतील एक शीत शवपेटी गुरुवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात बसविण्यात आली.

सावित्रीबाई फुले रुग्णालयासह आयसोलेशन हॉस्पिटल व पंचगंगा रुग्णालय येथे अशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शीत शवपेटीत शून्य ते पाच अंश इतक्या कमी तापमानात मृतदेह किमान दोन दिवस ठेवला जाऊ शकतो. सध्या डी. वाय. पाटील व प्रमिलाराजे रुग्णालय येथेच अशा प्रकारच्या शवागाराची सोय आहे. आणखी एका खासगी रुग्णालयात अशी सोय आहे; परंतु या यंत्रणेवर अधिक भार पडतो, तेव्हा मृतदेह कोठे ठेवायचा, असा प्रश्न नातेवाइकांना सतावत असायचा. महापालिकेकडून ही गैरसोय दूर करण्याकरिता चार शीत शवपेट्या घेण्यात येणार आहेत.

अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेतील कोल्हापूर महानगरपालिका ही पहिलीच आहे. अन्य कोणत्या महापालिकेत अशी सोय नाही. उद्घाटनप्रसंगी उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समितीचे सभापती देशमुख, नगरसेविका दीपा मगदूम, प्रतीक्षा पाटील, माधुरी लाड, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सचिन पाटील, संजय मोहिते, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, विनायक फाळके, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते.

 

 

Web Title: Coffin facility in Savitribai will take three more coffins: Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.