गुळाचे सौदे पाडले बंद
By Admin | Updated: April 2, 2015 00:40 IST2015-04-02T00:31:03+5:302015-04-02T00:40:50+5:30
२० हजार रवे पडून : अन्न-औषधाच्या कारवाईने व्यापारी आक्रमक

गुळाचे सौदे पाडले बंद
कोल्हापूर : सौद्यात खरेदी केलेल्या गुळाची सॅम्पल घेऊन संपूर्ण गूळ जप्तीची कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक झाले. व्यापाऱ्यांनी बुधवारी (दि.१) गुळाचे सौदे काढण्यास नकार दिल्याने सुमारे २० हजार गुळाचे रवे समितीत पडून आहेत. समितीमध्ये शुक्रवारी (दि. २७) सौदा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ए. एच. कातावाला यांच्या गोडावूनमधून गुळाची सॅम्पल घेतली. गुळात हायड्रॉस पावडरचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आल्याने अधिकाऱ्यांनी सर्व गूळ जप्त करून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली. व्यापारी आक्रमक झाले असून गूळ शेतकरी तयार करतात, मग कारवाई आमच्यावर का? असा सवाल करत बुधवारी सकाळी व्यापाऱ्यांनी गुळाचे सौदे काढण्यास नकार दिला. बुधवारी समितीत एक किलोचे साडेपाच हजार तर दहा किलोचे १५ हजार गूळरव्याची आवक झाली. सौदे काढले नसल्याने २० हजार गूळ रवे बाजार समितीत पडून आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रशासक रंजन लाखे यांनी व्यापारी, शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. गुळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी समितीची असल्याने समितीने गूळ खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. शेतकरी, व्यापारी व समिती अधिकाऱ्यांत शाब्दिक चकमक उडाली. गुळात भेसळ व्यापाऱ्यांकडे होत नाही, मग आमच्यावर कारवाई का? असा सवाल व्यापाऱ्यांनी केला. चूक नसताना गुन्हे दाखल होणार असतील तर आम्हाला हा व्यवसायच नको, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने पेच निर्माण झाला.
अखेर गुरुवारी सहकार व पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बैठक घेऊन कारवाईबाबतचा विषय संपविण्याचा निर्णय घेतला. पण सौदे सुरू करण्यास नकार दिला. सौद्यात गूळ घेतल्यानंतर बाहेर पाठविताना अन्न औषध विभागाने कारवाई केली तर त्यास जबाबदार कोण? विनाकारण गुन्हे अंगावर का घ्यायचे? असा सवाल व्यापाऱ्यांनी केल्याने सौद्याचा पेच कायम राहिला. (प्रतिनिधी)
समितीच्या दारात गूळ ओतू
गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, अवकाळी पाऊस, गुळाचा घसरलेल्या दरामुळे गुऱ्हाळघरांसाठी यंदाचा हंगाम अडचणीचा ठरला आहे. अशा परिस्थितीत गाळप करून गूळ समितीत आणून सौदे होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला. व्यापारी खरेदी करत नसतील आणि बाजार समिती केवळ बघ्याची भूमिका घेणार असेल, तर आम्ही समितीच्या दारात गूळ ओतू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.