प्रांतकचेरीच्या जागेसाठी उद्या बंद

By Admin | Updated: January 1, 2015 00:14 IST2014-12-31T22:36:15+5:302015-01-01T00:14:43+5:30

गडहिंग्लजला सर्वपक्षीय बैठक : भूमिअभिलेख, प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्याचा निर्णय

Closed for provincial premises tomorrow | प्रांतकचेरीच्या जागेसाठी उद्या बंद

प्रांतकचेरीच्या जागेसाठी उद्या बंद

गडहिंग्लज : प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या धर्मशाळा इमारत व जागेस वहिवाटदार म्हणून उपविभागीय अधिकारी यांचे नाव परस्पर लावल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २) गडहिंग्लज शहर बंद ठेवून येथील भूमिअभिलेख कार्यालय व प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे होत्या.
शहर विकास आराखड्यात प्रांतकचेरीची जागा नगरपालिकेने दुकान गाळ्यांसाठी आरक्षित ठेवली आहे. त्यापासून पालिकेस उत्पन्न मिळणार असल्यामुळे ती जागा परत मिळविण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, शासनाकडून ही जागा अद्याप हस्तांतरित झालेली नाही.
दरम्यान, गडहिंग्लजच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भूमिअभिलेख उपअधीक्षकांनी या जागेच्या ‘प्रॉपर्टी कार्डात’ फेरफार केली आहे. त्याबद्दल आजच्या बैठकीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गडहिंग्लजकरांच्या अस्मितेचा विषय म्हणून शासनाकडून ही जागा परत मिळविण्यासाठी जनआंदोलना बरोबरच न्यायालयीन लढाई करण्याचा निर्णय यावेळी झाला.
माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री म्हणाले, प्रांतकचेरीच्या जागेवरील दुकानगाळ्यांच्या आरक्षणास मंजुरी आहे. १९९९ मध्ये त्याठिकाणी दुकानगाळे बांधले जाणार होते. मात्र, तत्कालीन प्रांतांनी हरकत घेतल्यामुळे ते काम रखडले आहे.
माजी नगराध्यक्ष अकबर मुल्ला म्हणाले, प्रांताधिकारी भाडेकरू आहेत. त्यांनी काही वर्षे भाडेदेखील दिले आहे. त्या इमारतीची देखभाल दुरुस्ती व सुविधाही आजअखेर पालिकाच पुरवते. मग, प्रांताधिकारी त्या जागेचे मालक कसे झाले?
प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, पर्यायी जागेत प्रांतकार्यालय स्थलांतरित करावे, जागा अडवून शहराच्या विकासात अडथळा आणू नये. काँगे्रसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी म्हणाले, जनआंदोलनाबरोबरच उच्च न्यायालयात दाद मागावी. भाजपचे शहराध्यक्ष आनंद पेडणेकर म्हणाले, जनतेच्या रेट्याशिवाय जागा परत मिळणार नाही.
बैठकीस मुख्याधिकारी तानाजी नरळे, नगरअभियंता रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, सुनील चौगुले, डॉ. एम. एस. बेळगुद्री, शिवाजी नाईक, प्रा. रमेश पाटील, महेश पाटणे, विठ्ठल भमानगोळ, संजय खोत, अर्जुन भोईटे, महावीर दसूरकर, गुलाब सय्यद, आण्णासाहेब देवगोंडा, मोहन बारामती, वसंत शेटके, आदींसह विविध पक्षसंघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हातगाडी-खोकीधारक संघटनेचे अध्यक्ष दादू पाटील, मनसेचे नागेश चौगुले, ‘जनसुराज्य’चे चंद्रकांत सावंत यांनीही सूचना मांडल्या. नगरसेवक हारूद सय्यद यांनी स्वागत केले. नगरसेविका अरुणा शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


कायदेशीर लढाईचा निर्णय सोमवारी
भूमिअभिलेख कार्यालयाने प्रांतकचेरीच्या जागेस वहिवाटदार म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्या नावाची नोंद केल्याबाबत विचारविनिमय करून कार्यवाहीची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी (दि. ५) नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत याप्रश्नी कायदेशीर लढाईचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Closed for provincial premises tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.