स्वच्छ, सुंदर प्रभाग धुळीने माखला
By Admin | Updated: February 15, 2015 23:47 IST2015-02-15T23:25:18+5:302015-02-15T23:47:36+5:30
पुरस्कारविजेत्या प्रभागाची अवस्था : प्रमुख रस्त्यांची कामे रखडली, पण कामाबद्दल समाधान

स्वच्छ, सुंदर प्रभाग धुळीने माखला
कोल्हापूर : सलग दोन वर्षे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात यश मिळविणाऱ्या ‘राजारामपुरी एक्स्टेंशन’ प्रभागातील नागरिकांना सध्या धुळीचा सामना करावा लागत आहे. अंतर्गत तसेच काही प्रमुख रस्त्यांची कामे रखडल्याने धूळ आणि खड्ड्यांतूनच मार्ग काढत घर गाठण्याची कसरत नागरिकांना करावी लागते. रस्त्यांच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा त्यांना लागली आहे. वेळेवर कचरा उठाव, स्वच्छता आणि ड्रेनेज लाईनची पूर्तता करण्यात नगरसेवकांनी यश मिळविल्याचे दिलासादायक चित्र दिसते. क्षेत्रफळ आणि मतदारसंख्येनुसार महापालिका क्षेत्रात हा प्रभाग तृतीय क्रमांकावर आहे. राजारामपुरी १४ वी गल्ली, सायबर कॉलेजची मागील बाजू, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, एस. टी. कॉलनी, मंडलिक पार्क, संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, असा परिसर या प्रभागात येतो. येथील मतदारसंख्या ७,२०० इतकी आहे. प्रभागात पहाटे पाणी येते; पण त्याच्या वेळेत बदल होण्याची मागणी नागरिकांची आहे. सायबर चौकातील टाकीतून काटकर माळ, आदी परिसराला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, या टाकीला गळती लागल्याने परिसरात अपुरा पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा उठाव नियमितपणे होतो. स्वच्छतेबाबत या प्रभागाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात २०१२ मध्ये द्वितीय, तर २०१३ मध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. राजारामपुरी पोलीस ठाणे ते सेनापती बापट मार्गावरील ड्रेनेज लाईन व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यात आठव्या गल्लीपर्यंत काम पूर्ण झाले असून, त्यापुढील काम गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. याठिकाणी ड्रेनेजलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांमुळे त्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. शिवाय या मार्गावरील काही कचराकुंड्यांमध्ये वैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली.
मंडलिक पार्ककडून एस. टी. कॉलनीत जाणाऱ्या मार्गावरील मोठ्या गटर्सच्या भिंती बांधण्याचे काम अर्धवट आहे. शिवाय शाहू जलतरण तलावाकडील रस्त्यावरील ड्रेनेज लाईन उघड्यावरच आहेत. सायबर चौक ते मंडलिक पार्क रिक्षा स्टॉप, स्वामी पाणीपुरवठा ते मंडलिक पार्क, राणे स्कूल ते सुभांजली बंगला, आठवी गल्ली, बारावी गल्ली आणि नववी गल्ली, तसेच भारत हौसिंग सोसायटी, सरनाईक माळ येथील अंतर्गत, तसेच काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने तेथील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
शाहू जलतरण तलावाशेजारील गार्डनसाठी सँडपिच, वॉकिंग ट्रॅक व अंतर्गत विकासाचे काम, गंगातीकर घर ते कुंभार घर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम गतीने पूर्ण होण्याची आवश्यकता आहे.
प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईन, गटर्स व गार्डन डेव्हलपमेंटची ८० टक्के कामे माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह महानगरपालिकेच्या निधीतून पूर्ण केली आहेत. शिवाय सध्या एक कोटी ६६ लाखांची कामे सुरू आहेत. तसेच कोरगावकर हौसिंग सोसायटी, राजारामपुरी १३व्या गल्लीतील भोपळे चाळ या ठिकाणी गटर्स, आदी स्वरूपातील नऊ लाख ९० हजारांची कामे नियोजित आहेत. अपूर्ण कामे मार्चअखेर पूर्ण करणार आहे. - राजू पसारे, नगरसेवक