Clean the city's water tanks | शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार

शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार

ठळक मुद्देशहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणार कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या निविदा प्रसिद्ध

कोल्हापूर : शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. तसेच काही टाक्यांची स्वच्छता अनेक वर्षांपासून केलेली नाही. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रसिद्ध केलीआहे. त्यामुळे लवकरच शहरातील टाक्या स्वच्छ केल्या जातील.

कोल्हापूर महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ठिकठिकाणी पाण्याच्या २८ टाक्या आहेत. उपसा केंद्रांतून पाणी या टाक्यांमध्ये आणले जाते. येथून परिसरात पाणीपुरवठा केला जातो. यांपैकी बहुतांश टाक्या अनेक वर्षांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. काही टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पुईखडी येथे पाणीपुरवठा विभागाचे शुद्धीकरण केंद्र आहे.

उपसा केंद्रातून येथे पाणी आणले जाते. लाखो रुपये खर्च करून पाणी शुद्धीकरण केले जाते. मात्र, बहुतांश टाक्यांची अनेक वर्षे स्वच्छता केली नसल्यामुळे स्वच्छ केलेले पाणी अस्वच्छ होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी टाक्या स्वच्छ असणे आवश्यक आहे.

यासाठी पाणीपुरवठा विभागाने टाक्या स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. उंच व बैठ्या टाक्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रतिहजारी लिटर्सप्रमाणे टाक्या स्वच्छतेसाठी संबंधित कंपनीला निविदा देण्यात येणार आहेत. १९ नोव्हेंबरपर्यंत कोटेशन देण्याच्या सूचना महापालिकेच्या प्रशासनाने केल्या आहेत.

 • शहरात पाणी कनेक्शन - १ लाख १० हजार
 • प्रभाग संख्या- ८१
 • पाण्याच्या टाक्या- २८
 • वॉर्ड संख्या- ५
 • नदीतून दररोज उपसा होणारे पाणी- १२0 एमएलडी
 • शहराचे क्षेत्रफळ- ६६.८२ कि.मी.


पहिल्या टप्प्यात स्वच्छता होणाऱ्या टाक्या

 • साळोखेनगर
 • पुईखडी फिल्टर
 • कोकणे मठ
 • शालिनी टाकी

  शहरातील प्रमुख पाण्याच्या टाक्या

  पाण्याचा खजिना, पाण्याचा खजिना नवीन उंच टाकी, शालिनी टाकी, चंबुखडी, पुईखडी, आपटेनगर, साळोखेनगर, कळंबा फिल्टर, पद्मावती मंदिर, शेंडा पार्क, आर.के.नगर सोसायटी उंच टाकी, आर. के.नगर गणपती मंदिर परिसर, मोरेवाडी दगडी टाकी
   
 • एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

  टाकी स्वच्छ करण्यासाठी एक दिवस टाकी रिकामी असणे आवश्यक आहे. संबंधित टाकीवर आवलंबून असणाऱ्या परिसराचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होणार आहे. स्वच्छ पाण्यासाठी टाकी स्वच्छ असणे आवश्यक असल्याने नागरिकांना एक दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.
   

 

Web Title: Clean the city's water tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.