शहराची उडाली ‘धूळ’दाण
By Admin | Updated: December 5, 2014 00:51 IST2014-12-05T00:01:27+5:302014-12-05T00:51:36+5:30
धूळीचे प्रमाण पाचपट : चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेच्या अहवालात निष्कर्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शहराची उडाली ‘धूळ’दाण
कोल्हापूर : चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात कोल्हापूर शहरातील धुळीचे प्रमाण पाचपटींनी वाढल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. हवा प्रदूषण नियमन कायद्यान्वये हवेतील धुळीची मर्यादा १५० ४ॅ/े3 आहे; पण प्रयोग शाळेच्या अहवालात कोल्हापुरातील हे प्रमाण सुमारे ७०० ४ॅ/े3 इतके असल्याचे आढळून आले आहे़ यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे़
कॉमन मॅन संघटनेच्या मागणीनुसार कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ४ नोव्हेंबरला रंकाळा येथील जावळाचा गणपती चौक, चप्पल लाईन आणि राजारामपुरी येथे एचव्हीएस मशीन्स ठेवली होती़ सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत या मशीन्सद्वारे नमुने संकलित करण्यात आले. हे नमुने ५ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाने चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठविले़ या नमुन्यांचा अहवाल प्रदूषण मंडळाला नुकताच प्राप्त झाला असून, त्यामध्ये शहरातील धुळीचे प्रमाण कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणापेक्षा पाचपट जास्त असल्याचे आढळून आले आहे़ हा अहवाल महानगरपालिकेस पाठविण्यात आला असून, महानगरपालिका याबाबत आता काय उपाययोजना करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे़
शहरात अंदाजे ६०० किलोमीटरचे रस्ते असून, त्यांची दुरवस्था झाली आहे़ या रस्त्यांवरून वाहनांची ये-जा होताना मोठ्या प्रमाणावर धूळ निर्माण होते़ या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आणि डोळ्यांचे आजार होत आहेत़ या पार्श्वभूमीवर कॉमन मॅन संघटनेच्या बाबा इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती़ शहर धुळीने माखण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उखडलेले रस्ते व डांबरीकरण न केलेले रस्ते. शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी धुळीचा त्रास होतोच. शहरात कुठे ना कुठे ड्रेनेज, जलवाहिनीची कामे सुरू असते. त्यासाठी रस्ता उकरला जातो. काम झाल्यावर मातीचा ढीग तसाच ढकलून दिला जातो. अशा कामांसाठी उकरलेला रस्ता किती दिवसांत डांबरीकरण करायचा याचे कोणतेही नियोजन महापालिकेकडे नाही. त्यामुळे या मातीवरून वाहने गेली की त्याचा धुरळा उडतो. अनेक भाग असे आहेत की जिथे कित्येक वर्षात रस्त्याला डांबरच लागलेले नाही. त्यामुळे अशा रस्त्यावरून वाहने गेली किंवा मुख्यत: केएमटी बस गेली की हवेत धुळीचा लोट उसळतो. एकदोन वेळा अशा धुळीचा अनुभव घेतला की तुम्ही आजारी पडलाच म्हणून समजा हे ठरलेले असते. डांबरी रस्ता केल्यानंतर कंत्राटदार त्यावर क्रशर पीठ टाकतो. डांबराचा वापर कमी झाला असल्याने या पीठाचाही धुरळा कांहीदिवस उडत राहतो. म्हणजे रस्ता होऊनही धूळ लोकांची पाठ काही सोडत नाही.
धुळीमुळे श्वसनाचे विकार
वातावरणातील प्रमाणापेक्षा अधिक धूळ मानवी आरोग्यास घातक आहे. धुळीमुळे धाप लागणे व श्वसनाने विकार जडतात तसेच योग्य काळजी न घेतल्यास डोळे व त्वचेच्या विकारांनाही निमंत्रण मिळते. ‘अॅलर्जी’ असलेल्या व्यक्तींना धुळीपासून अधिक धोका असतो. सातत्याने धुळीच्या संपर्कात राहिल्यास सुदृढ व्यक्तींनाही श्वसनाचे आजार जडू शकतात. धुळीच्या रस्त्यांवरून प्रवास करताना नाक व तोंडाला स्वच्छ रूमाल बांधा. सातत्याने धुळीत जाणे टाळा, योग्यवेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- डॉ. उमेश कदम, जनरल फिजिशियन
कारखाना किंवा विशिष्ट जागेतील हवेचे प्रदूषण असल्यास संबंधित आस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नोटीस पाठवली जाते किंवा कारवाईची शिफारस केली जाते. परंतू शहरातील अशा प्रकारच्या प्रदूषणास रस्ते,वाहने अशी विविध घटक कारणीभूत असतात. त्यामुळे त्यास एकट्या महापालिकेस जबाबदार धरता येत नाही.
- एस.एस.डोके
प्रादेशिक अधिकारी
प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर.
येथे सुरू आहेत कामे
जावळाचा गणपती ते रंकाळा स्थानक
सर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँट
वाय. पी. पोवारनगर
राजारामपुरी मेन रोड
स्टेशन रोड
जरगनगर
सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रोड
कदमवाडी ते भोसलेवाडी चौक
रेणुका मंदिर ते शाहू जन्मस्थळ
साई मंदिर ते फुलेवाडी नाका
टिंबर मार्केट ते राज क पूर पुतळा
यल्लमा मंदिर ते जवाहरनगर
काम सुरू, पण कासवगतीने
कोल्हापूर : सध्या सुरू असलेल्या शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, ठेकेदार व प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने दोन दिवसांच्या कामाला पंधरा दिवस लागत आहेत. ‘काम सुरू, रस्ता बंद’ असे शहरातील बहुतांश रस्त्यांवरील चित्र आहे.
शहरातील १५०हून अधिक रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी हाती घेतली आहे. रस्त्यांचे काम वेळेत सुरू झाले असले तरी समन्वयाअभावामुळे रखडण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम रात्रीच्या वेळेत व जलद गरजेचे असताना तसे कासवगतीने सुरू आहे.
महापालिकेने सात रस्त्यांवर दुरुस्तीमुळे वाहतुकीस अडथळा होणार असल्याचे पत्राने कळविले आहे. याठिकाणी वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी बॅरिकेटस् व इतर व्यवस्था केली आहे. शहरातील रस्ते चकाचक झाल्यानंतर त्याचा फ ायदाच होणार असल्याने वाहनधारकांनी सहकार्य करावे.
- आर. आर. पाटील (निरीक्षक शहर पोलीस वाहतूक शाखा)