मुरगूड शहर झाले हागणदारीमुक्त
By Admin | Updated: October 30, 2015 23:25 IST2015-10-30T22:35:14+5:302015-10-30T23:25:46+5:30
पालिका सभेत घोषणा : पाण्याच्या टँकरचे भाडे वाढविण्याचा निर्णय, प्लास्टिक पिशव्यांवरही जोरदार चर्चा

मुरगूड शहर झाले हागणदारीमुक्त
मुरगूड : शासनाच्या आदेशान्वये नगरपरिषद हद्दीमध्ये उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून, अशा कुटुंबांना शौचायल बांधण्यास अनुदान देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्याचा पूर्णपणे प्रतिंबंध केल्याने आणि सध्या शहरातील कोणीही उघड्यावर शौचास बसत नसल्याने मुरगूड शहर हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या मुरगूड पालिका सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रेखा सावर्डेकर होत्या. मुख्याधिकारी बी. एस. जगताप, शहर अभियंता प्रकाश पोतदार, सूर्याजी भोपळे, अनिल गंदमनवाड, मारुती शेट्टी, अशोक तांबट, दिलीप कांबळे,आदी अधिकाऱ्यांनी सभागृहाला शासकीय माहिती पुरविली.
पालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीच्या मोहिमेबाबत विरोधी पक्ष नेता किरण गवाणकर यांनी आक्षेप घेत, व्यापाऱ्यांची बाजू उचलून धरली. पालिकेने जप्त केलेल्या प्लास्टिक पिशव्या ह्या कशावरून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, असा प्रश्न उपस्थित करून दुकानावर धाडी टाकण्याअगोदर पालिकेने तशा आशयाची नोटीस पाठवावी, अशी मागणी ही त्यांनी केली. शिवाय शासनाने प्लॉस्टकविरोधी अध्यादेश काढला आहे का, अशी विचारणा केली. दिवाळीपर्यंत परत कारवाई न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्याधिकारी बी. एस. जगताप यांनी शासनाच्या आदेशान्वयेच आपण कारवाई केल्याचे सांगत, तशा पद्धतीची नोटीस दुकानदारांना दिल्याचेही सांगितले. याशिवाय पालिकेकडील आस्थापनावरील वेतन व नियमित वेतन यांच्यावरील थकीत लाभाची रक्कम १३ व्या वित्त आयोग अनुदानातून देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. याला अनुसरून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली. याशिवाय पालिकेकडून कचरा शुल्क मासिक पाच रुपयांप्रमाणे नागरिकांकडून आकारणी केली जात होती. याबाबात प्रशासनाने सदरची आकारणी ३० रुपये करण्याला मान्यता देण्यात आली.
एकनाथ मांगोरे यांनी लोखंडी तिरडीची सोय करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी, परेश चौगले, किरण गवाणकर, सुहास खराडे, वसुधा कुंभार, माया चौगले, नम्रता भांदिगरे, गौराबाई सोनुले,
फुलाबाई कांबळे, अनिता भोसले, सुजाता पाटील, वैशाली सुतार, रूपाली सणगर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
१०० रुपयांची वाढ : प्रतिटँकर ३०० रुपये
पालिकेकडून शहरातील सार्वजनिक अथवा घरगुती कार्यक्रमासाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविले जातात. यासाठी टँकरचा खर्च म्हणून प्रतिटँकर २०० रुपये आकारणी केली जात होती. सध्याच्या तुलनेत ही आकारणी कमी असल्याने २०० ऐवजी प्रति टँकर ४०० रुपये आकारणी करण्याबाबत चर्चा झाली. सर्वानुमते १०० रुपयांची वाढ निश्चित करून प्रति टँकर ३०० रुपये आकारणी ठरविण्यात आली.