वीज मीटरच्या टंचाईमुळे नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:37+5:302021-02-05T07:08:37+5:30
विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : घरगुती, व्यावसायिक आणि शेती पंपासाठी नवीन कनेक्शन सुरू करताना लागणाऱ्या वीज मीटरची राज्यात ...

वीज मीटरच्या टंचाईमुळे नागरिक हैराण
विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरगुती, व्यावसायिक आणि शेती पंपासाठी नवीन कनेक्शन सुरू करताना लागणाऱ्या वीज मीटरची राज्यात गेल्या महिन्याभरापासून टंचाई असल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकरी कमालीचा हैराण झाला आहे. गेली अनेक वर्षे रखडलेली कनेक्शन मिळायला आता कुठे सुरुवात झाली असताना ते कनेक्शन मीटर नसल्याने सुरू होण्यात अडचणी आहेत. राज्यात सिंगल फेजची व थ्री पेजची महिन्याला किमान ९० हजार नवीन मीटरची गरज असते.
‘लोकमत’ने शुक्रवारी महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे याबद्दल विचारणा केली असता त्यांनी नागरिकांनी स्वत:हून बाजारातून मीटर विकत घेऊन त्याची महावितरणकडे चाचणी करून घ्यावी व ते मीटर बसवून घ्यावे, असे सुचविले. परंतु बाजारातही ही मीटर सहजासहजी उपलब्ध नाहीत. राज्यात सिंगल फेजची अडीच लाख मीटर शिल्लक असल्याचे त्यांच्या कागदोपत्री रेकॉर्डवरून दिसते. परंतु, प्रत्यक्षात लोकांना मात्र मीटर मिळत नाहीत म्हणून तक्रारी आहेत. सध्याच्या मीटरचे दरमहा रीडिंग घेताना प्रत्येक मीटरची जाग्यावर जाऊन नोंद घ्यावी लागते. घर बंद असेल तर पुन्हा हेलपाटे होतात. त्यात मनुष्यबळ आणि वेळेचा अपव्यय होतो. तो टाळण्यासाठी आता रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) मीटर बसविण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. महावितरणची मोबाईल व्हॅन एका गल्लीतून गेल्यावर त्या गल्लीतील सर्व मीटरचे बिलिंग त्यामध्ये नोंद होईल. आता नवीन कनेक्शनसाठी हीच मीटर बसविण्यात येणार आहेत. अशी राज्यभरात २० लाख मीटर बसविण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. थ्री फेजची २ लाख मीटर मागविली असून, ती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतील. सिंगल फेजची मीटर मिळण्यास कदाचित महिनाभर लागेल असे महावितरणच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
मधला मार्ग..
महावितरणचे कनेक्शन मिळतानाच ग्राहकाला मोठ्या दिव्यांतून जावे लागते. आता ते कनेक्शन जोडले आहे; परंतु मीटरअभावी वीज पुरवठा सुरू करता येत नाही अशी स्थिती आहे. त्यातून मार्ग म्हणून कृषी पंपांना अश्वशक्तीप्रमाणे बिल आकारणी करून ही कनेक्शन मीटर न बसविताच सुरू करण्यात येत आहेत.
उत्पन्न थांबले..
नवीन कनेक्शनमुळे महावितरणचे उत्पन्न वाढणार आहे. परंतु, तरीही मीटर लवकर उपलब्ध करून देण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा अनुभव येत आहे.
मीटर अशी असतात..
सिंगल फेज : मुख्यत: घरगुती ग्राहकांसाठी - किंमत सरासरी १००० रुपये
थ्री फेज : औद्योगिक, व्यापारी, मोठ्या अपार्टमेंटमध्ये लिफ्टसाठी व शेती पंपासाठी : किंमत सरासरी-१५००
फोटो : २९०१२०२१-कोल-रेडिओ मीटर