राष्ट्रीय सुरक्षितेत नागरिकांचीही जबाबदारी, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 11:40 AM2024-02-03T11:40:07+5:302024-02-03T11:40:39+5:30

अविचाराने पोस्ट फॉरवर्ड न करणेदेखील महत्त्वाचे

Citizens are also responsible for national security, Ex-Army Chief Manoj Naravane Assertion | राष्ट्रीय सुरक्षितेत नागरिकांचीही जबाबदारी, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

राष्ट्रीय सुरक्षितेत नागरिकांचीही जबाबदारी, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन

कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षितता ही बाब केवळ लष्कर, वायू आणि नौदलाची जबाबदारी नाही, तर या देशातील सर्व नागरिकांचीही ही जबाबदारी आहे हे प्रथम लक्षात घेण्याची गरज असल्याचे मत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले. शुक्रवारी येथील रोटरी परिषदेच्या उद्घाटनावेळी ‘राष्ट्रीय सुरक्षितता’ या विषयावर ते बोलत हाेते.

नरवणे म्हणाले, आपल्या देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असलेले लोक राहतात. मक्याची रोटी एकीकडे आणि पुरणपोळी दुसरीकडे. इतकी भिन्नता असली तरीही आपण भारत म्हणून एक आहोत. भारतातील ही वैविधता ही केवळ प्रचाराची संकल्पना नाही तर ती आमच्या जीवनाचा भाग आहे. हीच विविधता आपली ताकद असून, आता अमृतकाळात तर प्रगतीचा वेग वाढला आहे.

राष्ट्रीय सुरक्षितता हा विषय डोळ्यांसमोर आला की आपल्यासमोर लगेच सैनिक,रणगाडे, संचलन येते. परंतु, ही व्यापक संकल्पना आहे. केवळ सीमांचे संरक्षण नव्हे, तर या देशातील जमीन, ऊर्जा, पाणी, आरोग्य या सगळ्याचे संरक्षण म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता आहे. त्यामुळे ही सुरक्षितता करताना प्रत्येक भारतीय नागरिकाची त्यामध्ये भूमिका असली पाहिजे. बाह्य आणि अंतर्गत अशा सुरक्षिततेमध्ये आपल्याला दोन्हीकडे सातत्याने लक्ष द्यावेच लागेल. अनेकदा देशांतर्गत असुरक्षितता असते ती लवकर कळत नाही. तिचे बाहेरून नियंत्रण होत असते.

जसा आरेाग्यासाठी आपण विमा हप्ता भरतो तसाच निधी देशाच्या संरक्षणासाठीच्या निधीसाठीचा हप्ता असतो. आपल्या शेजाऱ्यांचे हेतू पाहता आपल्याला संरक्षणदृष्ट्या सिद्धच राहावे लागेल. सध्या सगळीकडे शांतता आहे मग लष्करावर इतका खर्च कशाला असे विचारले जाते. परंतु, ते योग्य नाही. कारण लष्करी सामर्थ्य एका रात्रीत उभे करता येत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजनपूवर्क खर्च करावा लागतो. ही एक प्रकारची गुंतवणूकही आहे. कारण देशांतर्गत संरक्षण उत्पादनांचे प्रमाण वाढले असून, तो पैसा देशातच राहतो.

शांतता हवी असेल तर युद्धसज्जता हवीच

पूर्वीपासून एक वाक्य सांगितले जाते की, ‘जर तुम्हाला शांतता हवी असेल तर युद्धसज्जता ठेवावीच लागते’. हे सत्य असून, त्यामुळेच गृहीत न धरता सर्व प्रकारची युद्धसज्जता ठेवण्याकडे भारताचा कल आहे. युक्रेनने याकडेच दुर्लक्ष केल्याने त्यांना ते महाग पडले. आपल्या देशाचे युद्ध झाले नाही तर आता जगात कुठेही युद्ध झाले तरी त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो हे वास्तव आहे.

अविचाराने पोस्ट फॉरवर्ड न करणेदेखील महत्त्वाचे

राष्ट्राच्या सुरक्षिततेचा विचार करता नागरिकांनी समाजविघातक पोस्ट आणि मजकूर फॉरवर्ड न करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे असा टोलाही यावेळी नरवणे यांनी लगावला. रोटरीने या सर्व गोष्टी डोळ्यांसमोऱ ठेवून उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Citizens are also responsible for national security, Ex-Army Chief Manoj Naravane Assertion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.