चौघींची मैत्रिणीला दुकानात घुसून मारहाण
By Admin | Updated: February 9, 2017 00:47 IST2017-02-09T00:47:36+5:302017-02-09T00:47:36+5:30
एकमेकींकडे बघण्यावरून कृत्य

चौघींची मैत्रिणीला दुकानात घुसून मारहाण
कोल्हापूर : एकमेकींकडे बघण्याच्या कारणावरून चौघा तरुणींनी जोतिबा रोडवरील कापड दुकानात काम करणाऱ्या मैत्रिणीला मारहाण केली. मंगळवारी (दि. ७) हा प्रकार घडला. जखमी तरुणीने या प्रकरणी बुधवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
अधिक माहिती अशी, घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे शिंगणापूर (ता. करवीर) येथील वीस वर्षांची तरुणी जोतिबा रोडवरील एका कापड दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करते. येथीलच सराफ व्यावसायिकाकडे सेल्समन म्हणून काम करणाऱ्या दोघा तरुणींबरोबर तिची मैत्री होती. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने त्या बोलत नव्हत्या. मंगळवारी दुपारी त्यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. सराफ दुकानात काम करणाऱ्या तरुणींनी आपल्या अन्य दोन मैत्रिणींना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर या चौघींनी मिळून दुकानात घुसून तिला मारहाण केली. यावेळी दुकानमालकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याला दुकान फोडण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी तरुणीने बुधवारी सकाळी कुटुंबीयांसह येऊन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. (प्रतिनिधी)