चिल्लर पार्टीच्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 19:46 IST2019-01-23T19:41:49+5:302019-01-23T19:46:17+5:30
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले.

कोल्हापूरात मामा भोसले विद्यामंदीर येथील कार्यक्रमात चिल्लर पार्टी बाल चित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभय बकरे, पद्मजा दवे, उषा सरदेसाई, विजय माळी आणि मिलिंद यादव उपस्थित होते.
कोल्हापूर : येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले.
महानगरपालिकेच्या मामा भोसले विद्यामंदीर येथे महानगरपालिकेतील शाळेतील मुख्याध्यापकांच्या बैठकीत भिरभिरं फिरवणाऱ्या मुलीचे छायाचित्र असलेल्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे यावेळी अनावरण झाले.
१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाºया या महोत्सवात सहा जागतिक चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत.
यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षिका उषा सरदेसाई, विजय माळी, सुधाकर सावंत, सुनील गणबावले, उत्तम गुरव यांच्यासह चिल्लर पार्टीचे अभय बकरे, गुलाबराव देशमुख, पद्यजा दवे, शिवप्रभा लाड आदी उपस्थित होते.
चिल्लर पार्टीसारख्या संस्थेने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी ही दिलेली अविस्मरणीय संधी आहे. गेली सात वर्षे ही संस्था हा उपक्रम सातत्याने राबवित असल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात प्रशासन अधिकारी यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मामा भोसले विद्यामंदीर येथे झालेल्या महानगरपालिकेतील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे समन्वयक मिलिंद यादव यांनी चिल्लर पार्टीची संकल्पना सांगितली. या बैठकीत सर्व महानगरपालिकेतील शाळांचे विद्यार्थी सहभागी करण्याबाबत यावेळी यादव यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
झोपडपट्टीतील आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत चित्रपट हे माध्यम पोहोचविण्याचा चिल्लर पार्टीचा हेतू आहे. या संकल्पनेला महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानीही पाठिंबा दिल्यामुळे यंदाही या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा दोन दिवसाचा बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.