मुलांनी अवांतर वाचन करावे
By Admin | Updated: November 30, 2014 23:59 IST2014-11-30T23:40:53+5:302014-11-30T23:59:17+5:30
नीलम माणगावे : मजले येथे बालसाहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन; ग्रंथदिंडीचे आकर्षण

मुलांनी अवांतर वाचन करावे
आळते : संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी बालसाहित्य प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागात अशी संमेलने वरचेवर भरवली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त करीत मुलांनी पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ लेखिका नीलम माणगावे यांनी केले.
मजले (ता. हातकणंगले) येथे आयोजित पहिल्या बालसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात माणगावे बोलत होत्या. तत्पूर्वी रजनी हिरळीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माणगावे म्हणाल्या, मुलांना घडविण्यात पालकांचीही तितकीच जबाबदारी आहे. घराघरांत टी.व्ही.बरोबर पुस्तकेही दिसली पाहिजेत. लहान वयात लागलेल्या चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकतात. मुलांमध्ये क्षमता असते. मात्र, त्यांना योग्यवेळी दिशा मिळणे आवश्यक असते. त्यासाठी मुलांना संस्कार स्वरूपातील पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
हिरळीकर म्हणाल्या, बालसाहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचा शोध घेऊन समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अभ्यासक्रमासोबत शिक्षकांनी मुलांना अन्य वाचनीय साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.
स्वागताध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, साहित्य संमेलने वेगवेगळ्या प्रकारची होत असतात. परंतु, यामध्ये बालसाहित्यिकांना संधी दुर्मीळ असते. हा हेतू समोर ठेवून बालसाहित्य संमेलनाची संकल्पना पुढे आली. मजलेसारख्या डोंगरी भागात पहिले संमेलन भरविले. त्यास विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे प्रत्येक वर्षी संमेलन भरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळी ८ वाजता गावातून ग्रंथदिंडी काढली. यामध्ये ग्रंथप्रेमींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशोक घारगे यांच्या हस्ते डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. अविनाश पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, उपसरपंच छाया कोठावळे, सुमन पाटील, अमित पाटील, आदी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात ‘आपण हे वाचलेच पाहिजे!’ हा परिसंवाद झाला. कथाकथन, काव्यसंमेलन झाले. रोहिणी मोहिते, अंजली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)