कर्नाटकातील मुले भिकेसाठी सांगलीत
By Admin | Updated: July 29, 2014 23:31 IST2014-07-29T23:17:42+5:302014-07-29T23:31:09+5:30
संख्या वाढली : जन्मदात्यांची माहिती नाही

कर्नाटकातील मुले भिकेसाठी सांगलीत
ाचिन लाड ल्ल सांगली
खेळण्या-बागडण्याचं, शाळेत जाण्याचं त्यांचं वय... हातात दफ्तराऐवजी ताट... आणि ताटात देवीची मूर्ती घेऊन दिवसभर त्यांची पावलं शहराच्या कानाकोपऱ्यात भीक मागण्यासाठी फिरत असतात... दिवसेंदिवस अशा मुलांची संख्या सांगलीसारख्या छोट्या शहरात वाढत आहे. अनेकांना आपल्या जन्मदात्याची माहितीसुद्धा नाही. चौकशी केल्यानंतर ही मुले कर्नाटकातील असल्याचे समजले. भीक मागण्यात या मुलांचे कोवळे आयुष्य कोमेजून जात असताना त्यांच्यासाठी मदतीचा एकही हात पुढे येताना दिसत नाही.
मळलेले कपडे, विस्कटलेले केस आणि केविलवाणा चेहरा घेऊन ही मुले रस्तोरस्ती दिसत आहेत. या सर्वांची भीक मागण्याची पद्धत सारखीच आहे. शहरात दिसणाऱ्या भिकाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. ही मुले कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून भीक मागतात, असे नाही, तर त्यांच्या माध्यमातून भीक मागणे सुलभ व फायद्याचे ठरते म्हणून त्यांचा वापर केला जात आहे.
सोमवारी दुपारी सांगलीच्या स्टेशन चौकातून पाच लहान मुली व चार मुले हातात ताट व ताटात देवीची मूर्ती घेऊन भीक मागताना दिसून आले. काही वेळाने सर्व मुलांनी काँग्रेस भवनाजवळील कट्ट्यावर विसावा घेतला. त्यानंतर काहीजण राममंदिरच्या दिशेने निघून गेले, तर काहीजण आपटा पोलीस चौकीकडे गेले. या मुलांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पळून गेले. यामध्ये एक आठ वर्षाचा मुलगा होता. हा मुलगा एका आडोशाला जाऊन उभारला. तो फारच घाबरला होता. त्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र तो काहीच बोलला नाही. कोणाला काहीही न सांगण्याची धमकीही त्यांना दिली असावी, अशी शंका निर्माण होत होती. काही वेळाने शहराच्या स्टॅन्ड परिसरात अशीच मुले दिसली.
त्यातील काहींनी विजापूरहून आल्याचे सांगितले. सांगलीत भीक मागणारी अन्य मुलेही कर्नाटकातील असल्याचे त्यांनी सांगितले.
ही मुले नेमकी कुणाची?
मुलांच्या घोळक्यात काही महिलाही कडेवर मूल घेऊन भीक मागत असतात. शहरातील प्रत्येक मुलांवर अशा महिलांचे लक्ष असते. त्या महिला या मुलांच्या नातेवाईक आहेत की नाहीत, याची माहिती मिळत नाही. त्यांना याबाबत कोणी विचारतच नसल्याने दिवसेंदिवस कर्नाटकातून अशी मुले मोठ्या प्रमाणावर सांगलीत आणली जात आहेत.
दयेपोटी होते मदत...
अंगावर मळलेले कपडे, केस वाढलेले, पायात चप्पल नाही, शर्टाची बटणे तुटलेली, डोळ्यावर प्रचंड ताण, पोट खपाटीला गेलेले, अशा अवतारातील ही मुले पाहिल्यानंतर अनेकांना दया येते. त्यांना पैसे दिले जातात. हा भीक मागण्याचा फंडा असावा म्हणून अनेकजण त्यांना झिडकारतातही. तरीही दिवसभर त्यांची पावले चालत असतात. भीक मागण्यात कोमेजलेल्या आयुष्याला आकार देण्यासाठी शहराच्या गर्दीतून एकही मदतीचा हात पुढे येत नाही.
अवस्था पाहून संशयाला जागा
भीक मागण्यासाठी ज्या लहान मुलांचा वापर केला जातो, त्यांना पुरेसे खायला मिळत नसल्याचे त्यांच्या प्रकृतीवरून दिसून येते. या मुलांकडे पाहून कुणालाही दया आली पाहिजे, अशाच अवस्थेत त्यांना ठेवले जात असल्याचे चित्र आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलांची प्रकृती चांगली दिसत होती. त्यामुळे एकूणच मुलांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांचा वापर होत असावा, असा संशय बळावतो.