वस्तुसंग्रहालयास आधार मुलांचाच! -लोकमत विशेष

By Admin | Updated: August 3, 2014 22:47 IST2014-08-03T22:12:45+5:302014-08-03T22:47:58+5:30

अपेक्षित प्रतिसाद नाही : वर्षाकाठी ७ हजार नागरिकांची भेट

Children base for museum! -Local special | वस्तुसंग्रहालयास आधार मुलांचाच! -लोकमत विशेष

वस्तुसंग्रहालयास आधार मुलांचाच! -लोकमत विशेष

नरेंद्र रानडे - सांगली , येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या सांगली वस्तुसंग्रहालयाचा आर्थिक भार शालेय विद्यार्थ्यांनी समर्थपणे पेलला आहे. वस्तुसंग्रहालयाचे अस्तित्व कोणाच्या लक्षात येत नसले तरीही, वर्षाला सुमारे सात हजार नागरिक या वस्तुसंग्रहालयाला भेट देतात. त्यातील ७० टक्के मंडळी जिल्ह्यातील विविध शाळांतील विद्यार्थी असतात!
‘सांगली वस्तुसंग्रहालय’ हे सांगलीनगरीची अनोखी ओळख आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद अल्प असला तरीही, मागील साठ वर्षांपासून हे संग्रहालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टिकून आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या संग्रहालयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह जतन करण्यात आला आहे. यामध्ये तैलरंग व जलरंगातील चित्रे, हस्तिदंतावरील नाजूक कोरीव काम, चंदनाच्या मूर्ती, विविध धातूंचे ओतकाम, नक्षीकाम, उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने असणारी भांडी, प्राचीन ताम्रपट, श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी मारलेली हिंस्र जंगली जनावरे अशा सुमारे ९५० हून अधिक नानाविध वस्तू संग्रहालयात आहेत. परंतु हे संग्रहालय पाहण्यासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. शासन नियमानुसार अतिशय कमी शुल्क असूनही याकडे फारसे कोणी फिरकत नसल्याचे दिसते.संग्रहालयाचा इतिहासही रंजक आहे. १९१४ च्या महायुध्दावेळी मुंबईतील व्यापारी पुरुषोत्तम मावजी यांनी इतिहास संशोधकांच्या सहाय्याने मुंबई येथे ‘विश्रामभुवन’ या वस्तुसंग्रहालयाची स्थापना केली होती. महायुध्दानंतर मावजींनी संग्रहालयाचा काही भाग ‘प्रिन्स आॅफ वेल्स’ या संग्रहालयास विकला. त्यातील काही वस्तू सांगली संस्थानने विकत घेतल्या आणि सांगलीत ‘सांगली स्टेट म्युझियम’ सुरू झाले. संस्थानच्या विलिनीकरणानंतर हे संग्रहालय मुंबईस नेण्याची सरकारची योजना होती. परंतु ते सांगलीतच राहिले. प्रारंभी यावर विलिंग्डन महाविद्यालयाचे नियंत्रण होते. भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ९ जानेवारी १९५४ रोजी संग्रहालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी त्याचे नामकरण ‘सांगली वस्तुसंग्रहालय’ असे झाले. ३० जून १९७६ रोजी संग्रहालय पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या नियंत्रणात आले.

वस्तुसंग्रहालयातील काही वस्तू व चित्रांचा रंग उडून चालला आहे. त्यांचे जतन करण्यासाठी केंद्र शासनाकडून २९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. लखनौ येथील प्रयोगशाळेतील एक पथक वस्तुसंग्रहालयातील संबंधित वस्तूंची पाहणी करून गेले आहे. जतन केल्यास या सर्व वस्तूंचे आयुष्य १०० वर्षांनी वाढणार आहे.
- शंकर मुळे, सहाय्यक अभिरक्षक, सांगली वस्तुसंग्रहालय.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असणारे ‘सांगली वस्तुसंग्रहालय’ काही वर्षांत कुपवाड येथील पाच एकराच्या विस्तीर्ण जागेत स्थलांतरित होणार असल्याची शक्यता आहे. महापालिका विकास आराखड्यामध्ये स्थलांतराच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाला की स्थलांतराच्या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे.

Web Title: Children base for museum! -Local special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.