अंगणवाडीतील मुलांना हवे शैक्षणिक साहित्य
By Admin | Updated: July 21, 2014 00:26 IST2014-07-21T00:10:08+5:302014-07-21T00:26:56+5:30
हजारो गरजू मुले वंचित

अंगणवाडीतील मुलांना हवे शैक्षणिक साहित्य
कृष्णा सावंत -पेरणोली
कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यामध्ये दोन वर्षांपासून शैक्षणिक साहित्याचा पुरवठा न झाल्याने हजारो गरजू मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत.
२०१० मध्ये झालेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेपासून एकही मुलं वंचित राहू नये. त्याचबरोबर गळती राहू नये व मुलांना वयाच्या तीन वर्षांपासूनच शाळेची आवड निर्माण व्हावी. समाजातील सर्वच दुर्लक्षित घटकांना शिक्षण प्रवाहात आणावे या उद्देशाने १० ते १५ वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्च करून अंगणवाड्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने गावागावांतील महिलांना रोजगार मिळाला आहे. मुलांमध्ये शाळेची आवड व रुची निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी पाटी, चित्रकला पुस्तिका, रंगीत खडू, गणवेश, आदी शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा केला जातो. २०१०-११ पर्यंत सर्वच वर्गांतील मुलांना साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून साहित्यांचे वाटप न करण्यात आल्याने विशेषत: गरीब पालकांमधून जिल्हा परिषदेच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष घटक योजनेमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दरवर्षी देण्यात येतो. मात्र, जुलै महिना संपत आला तरी अद्याप गणवेश, पाटी, रंगीत खडू, चित्रकला पुस्तिका, आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आलेले नाही. २०१०-११ मध्ये एकदाच खुल्या वर्गातील मुलांना शालेय गणवेश देण्यात आला. त्यानंतर गणवेश वाटप करण्यात आलेले नाही.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शाळेऐवजी बाह्य कामकाजात गुंतवून ठेवण्यात आले आहे. शासनाकडून येणाऱ्या साहित्यांमधून घराकडूनच मुलांना खाऊ तयार करून आणावा लागतो. शासनाकडून तुटपुंजी अवांतर खर्चाची रक्कम मिळते. त्यामुळे स्वखर्चातूनच पीठाच्या गिरणीचा खर्च, गॅस, रॉकेलचा खर्च काहीवेळा करावा लागतो. त्यात कार्यालयातील बैठका त्यामुळे मुलांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होते.
जिल्ह्यातील अनेक गावांत
दोन अंगणवाड्या एकाच वर्गात बसविल्या जातात. आजरा तालुक्यातील खेडे, पेरणोली, वझरे, कुसळवाडी, आदी बहुसंख्य गावात एकाच वर्गात दोन अंगणवाड्या भरविल्या जात आहेत. सध्या फेडरेशनच्यावतीने लाफसी व खिचडी, सोजी करण्यासाठी गहू दिला जातो. गहू भरडून सोजी तयार करण्यामध्ये सेविकांचा वेळ वाया जातो. त्याशिवाय दिलेला गहू व
तयार केलेल्या सोजीमधील वजनामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे गहूऐवजी सोजी द्या, अशी मागणी पालकांमधून होत आहे.