चिकनगुनिया, डेंग्यूसोबत कोल्हापूरात या व्हायरल तापाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 14:01 IST2020-08-14T13:57:39+5:302020-08-14T14:01:41+5:30
कोल्हापूर शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. व्हायरल तापामध्ये चिकनगुनियासदृश्य लक्षणे दिसून येत असून रक्ततपासणी मात्र निगेटिव्ह येते. यामुळे नेमका हा आजार काय आहे, हा प्रश्न रुग्णांसह वैद्यकीय क्षेत्रालाही पडला आहे.

चिकनगुनिया, डेंग्यूसोबत कोल्हापूरात या व्हायरल तापाची लागण
कोल्हापूर : शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. व्हायरल तापामध्ये चिकनगुनियासदृश्य लक्षणे दिसून येत असून रक्ततपासणी मात्र निगेटिव्ह येते. यामुळे नेमका हा आजार काय आहे, हा प्रश्न रुग्णांसह वैद्यकीय क्षेत्रालाही पडला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच शहरांमध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि सर्वांशी डोकेदुखी ठरलेला व्हायरल ताप यांचे रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे एकाला ताप आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होत आहे. विशेषत: मंगळवार पेठ येथे या साथीचे रुग्ण मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.
येथील बालाजी पार्क परिसरात मागील महिन्यात हातापायाला सूज येणे, ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले होते आता रामानंदनगर, जरगनगर परिसरात हीच लक्षणे असणारे रुग्ण वाढले आहेत.
डासांच्या उत्पत्तीला सध्याचे वातावरण पोषक असल्यामुळे या साथीच्या आजारांना खतपाणी मिळत असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे.
डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ
कोरोनासंकट असतानाच इतर साथीचे आजारही मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. यामध्ये डेंग्यूची रुग्णसंख्याही वाढली आहे. खासगी आणि सरकारी लॅबमधून तपासणी केलेल्या ३०४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.
चिकनगुनिया सदृश्य तापाची साथ शहरात आली आहे. हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. रक्ताचा नमुना तपासणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह येतो. अशा रुग्णांनी भीती न बाळगता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. पुरेशी विश्रांती आणि औषधे घेतल्यानंतर हा आजार कमी होतो.
-डॉ. श्रीकांत शिंदे, बेलबाग