मुख्यमंत्र्यांकडून पी. एन. यांना आग्रह
By Admin | Updated: September 4, 2014 00:15 IST2014-09-04T00:14:08+5:302014-09-04T00:15:51+5:30
देवस्थान समिती अध्यक्षपद : नियुक्तीवरून पेच

मुख्यमंत्र्यांकडून पी. एन. यांना आग्रह
विश्वास पाटील - कोल्हापूर --पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तुम्हीच व्हा, असा आग्रह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे धरला आहे; परंतु त्यास पाटील यांनी नकार दिला आहे. सद्य:स्थितीत विधानसभा निवडणूक हेच माझे महत्त्वाचे लक्ष्य आहे. त्यामुळे अन्य कोणतीच जबाबदारी आपल्याला नको, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
देवस्थान समितीवरील रिक्त जागांवरील राष्ट्रवादीच्या कोट्यातील दोन सदस्यांची निवड नुकतीच झाली. संगीता खाडे व बी. एन. पाटील-मुगळीकर यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. त्या पदासाठी माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, डॉ. संजय डी. पाटील व सुरेश कुराडे यांची नावे चर्चेत आहेत. सदस्यांची निवड झाली; परंतु काँग्रेस अध्यक्ष निवडीस विलंब करीत आहे. कारण हे पद कुणाला द्यायचे, यावरून काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाकडून संजय पाटील यांचे नाव पुढे आले आहे. सतेज पाटील आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत; परंतु एकाच घरात किती पदे देणार, अशी चर्चा होईल, या भीतीपोटी ते निर्णय घ्यायला तयार नाहीत. घोरपडे यांना पी. एन. पाटील यांचा पाठिंबा आहे; परंतु त्यांच्याबद्दल तक्रारी असल्याने त्यांनाही मुख्यमंत्री संधी द्यायला तयार नाहीत. कुराडे यांचा नवा चेहरा आहे; परंतु त्यांची राजकीय ताकद कमी पडते त्यामुळे त्यांचा विचार होत नाही. अशा स्थितीत पी. एन. पाटील यांनाच अध्यक्ष करून हा गुंता सोडवावा, असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत पी. एन. यांना थेट विचारणा केली. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व वनमंत्री पतंगराव कदमही त्यावेळी उपस्थित होते; परंतु पी. एन. त्यास तयार नाहीत. देवस्थानच्या अध्यक्षपदाशिवाय हवे तर आणखी एखादे महामंडळाचे सदस्यत्वही देतो, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे; परंतु या जबाबदाऱ्या घेऊन त्यास वेळ देता येणार नसेल तर त्या आपणास नको, अशी त्यांची भूमिका आहे.
काँग्रेसकडे कोल्हापूरचे देवस्थान व शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आहे. राष्ट्रवादीकडे पंढरपूर व मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ३६०० मंदिरांचे व्यवस्थापन येते. देवस्थानच्या जमिनी प्रचंड आहेत. उलाढालही कोट्यवधी रुपयांची आहे. त्यामुळे इतके महत्त्वाचे पद असतानाही त्याकडे पी. एन. पाटील यांनी पाठ फिरवली आहे.
असे आहेत सदस्य
काँग्रेस : अध्यक्षपद रिक्त
सदस्य : हिरोजी परब (सिंधुदुर्ग)
प्रमोद पाटील (इचलकरंजी)
एक जागा रिक्त
राष्ट्रवादी :
संगीता खाडे (कोल्हापूर)
बी. एन. पाटील-मुगळीकर(गडहिंग्लज)
राजेंद्र देशमुख (सांगली)
रिक्त राहिल्यास...
देवस्थान समितीच्या अध्यक्षांसह सात सदस्यांची समिती आहे. त्यात प्रत्येकी तीन सदस्य काँग्रेस व राष्ट्रवादीचे आहेत. विधि व न्याय खात्यांतर्गत या समितीचा व्यवहार येतो. या समितीवरील सदस्य व अध्यक्षपदाची मुदत पाच वर्षांची आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हे पद न भरल्यास ते रिक्त राहू शकते. निवडणुकीनंतर ज्या पक्षाचे सरकार येईल ते आपल्या कार्यकर्त्याला संधी देतील.