मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात; कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाबाबत आढावा बैठक घेणार
By समीर देशपांडे | Updated: April 12, 2024 17:20 IST2024-04-12T17:19:36+5:302024-04-12T17:20:15+5:30
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, शनिवारी (दि.१३) दुपारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरहून दुपारी अडीच वाजता ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात; कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघाबाबत आढावा बैठक घेणार
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, शनिवारी (दि.१३) दुपारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती संभाजी नगरहून दुपारी अडीच वाजता त्यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर एका हॉटेलवर विविध मान्यवरांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत.
संध्याकाळी सव्वा पाच वाजता महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी ते सांत्वन पर भेट देणार आहेत. यानंतर विश्व पंढरी येथे सांगवडेकर महाराजांची ते भेट घेणार असून पुन्हा एका हॉटेलवर विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर रात्री दहा वाजता ते कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असून त्यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठीच हा दौरा असल्याचे सांगण्यात येते. यानंतर पुन्हा सोमवारी मुख्यमंत्री शिंदे हे महायुतीचे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे सांगण्यात आले.