खंडपीठासाठी मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठविणार
By Admin | Updated: June 28, 2014 00:47 IST2014-06-28T00:45:26+5:302014-06-28T00:47:14+5:30
कृती समितीचा निर्णय : एकजुटीची मूठ बांधणार; सहा जिल्ह्यांतील वकिलांची कोल्हापुरातील बैठकीला उपस्थिती

खंडपीठासाठी मुख्य न्यायाधीशांना पत्र पाठविणार
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी प्राधान्याने निर्णय घ्यावा, अशा आशयाचे पत्र त्यांना तातडीने पाठविण्याचा निर्णय आज शुक्रवारी येथे झालेल्या सहा जिल्ह्यांतील मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे होते. बार असोसिएशनच्या सभागृहात ही बैठक झाली. त्यास सहाही जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. सहा जिल्ह्यांतील वकिलांनी या मागणीसाठी ५९ दिवस कामकाज बंद आंदोलन केले. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली. परंतु त्या समितीने अद्याप अहवालच दिलेला नाही. त्यामुळे या मागणीचे पुढे काय झाले, अशी संतप्त विचारणा बैठकीत झाली. त्याच आशयाचे पत्र देण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला. निमंत्रक घाटगे यांनी सुरुवातीलाच बैठक बोलाविण्याचा हेतू सांगितला व खंडपीठ लवकर होण्यासाठी कोणते पाऊल उचलावे याबाबत बैठकीत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासंबंधीच्या सूचनांचेही स्वागत केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य शिवाजीराव चव्हाण म्हणाले, खंडपीठासाठी आता लगेच आंदोलनाचे हत्यार उगारू नये. त्याऐवजी मुख्य न्यायाधीशांना पत्र देऊन निर्णयाचे काय झाले यासंबंधीची विचारणा करावी. कराड बार असोसिएशनचे संभाजी मोहिते यांनी या पत्रव्यवहारानंतरच आंदोलनाची दिशा निश्चित करावी, असे सुचविले. याबाबत कृती समिती जो निर्णय देईल त्याच्या पाठीशी आम्ही एकजुटीने उभे राहू, अशी ग्वाही सांगली बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब पवार, मिरजचे अध्यक्ष एफ. ए. झारी, सातारा बार असोसिएशनचे हेमंत लावंड, माळशिरस असोसिएशनचे बाळासाहेब शेळके, रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव ए. एन. शेट्टी यांनी दिली. इस्लामपूर बार असोसिएशनचे एच. डी. पाटील यांनीदेखील पाठिंबा व्यक्त करून तातडीने सर्व जिल्ह्यांचा एकत्रित मेळावा बोलवावा, असे सुचविले. बैठकीस मंगळवेढे बार असोसिएशनचे अध्यक्ष डी. सी. जाधव, रत्नागिरी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष संकेत घाग, डी. डी. घाटगे,पी. बी. गुरव, प्रकाश हिलगे, धनंजय पठाडे, शिवाजीराव राणे, पी.बी.आंबेकर, सुरेश कांबळे, प्रशांत चिटणीस, राजेंद्र किंकर, प्रशांत शिंदे, इचलकरंजी बार असोसिएशनचे एस.एन.मुदगल, गडहिंग्लजचे एस.के.जमादार, वडगांवचे श्रीनिवास कुंभार, कोल्हापूर बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सुशांत गुडाळकर, तेजगोंड पाटील, पूजा कटके, कुलदीप कोरगांवकर,उल्हास पवार,अनिल पाटील यांच्यासह वकील बांधव बैठकीस उपस्थित होते. कृती समितीचे सचिव अॅड. राजेंद्र मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष के. व्ही. पाटील यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)