छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

By Admin | Updated: June 7, 2014 00:54 IST2014-06-07T00:52:49+5:302014-06-07T00:54:34+5:30

शिवराज्याभिषेक दिन : भव्य मिरवणूक , शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

Chhatrapati Shivaji Maharaj accepted the offer | छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय..ऽऽ’ ‘हर हर महादेव..ऽऽ’, ‘जय भवानी जय शिवाजीचा गजर..ऽऽ’, धनगरी ढोल..लेझीम, झांजपथक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, टोलमुक्तीसह पंचगंगा प्रदूषणमुक्ती, लेक वाचवा, संयुक्त महाराष्ट्राची हाक, छत्रपती शिवाजी महाराजांसह बालशिवाजीचे सजीव देखावे अशा उत्साही वातावरणात ३४१व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मिरवणूक काढण्यात आली.
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित या मिरवणुकीचे उद्घाटन महापौर सुनीता राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, नगरसेवक आदिल फरास, गणी आजरेकर,
अ‍ॅड. धनंजय पठाडे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक उपस्थित होते.
शिवरायांच्या पुतळ््याचे पूजन करून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या सुरुवातीला रिक्षांवर ९ जूनच्या टोलविरोधी आंदोलनात इर्ष्येने सहभागी व्हा, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या देशाला शिवकालीन शिक्षेची गरज, मराठ्यांना आरक्षण देता का घरी जाता, पंचगंगेची गटारगंगा का झाली, दुर्गांवर पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब वाचवा, रायगडसंवर्धनासाठी हजार कोटींचा निधी द्या, कन्या वाचवूया यासह छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी यांचे सचित्र व प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते.
त्यानंतर बालशिवाजीसह छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून घोड्यावर आरुढ झालेले कार्यकर्ते होते. मराठा महासंघाचे वाशी येथील झांजपथक, शिवाजी पेठ, उद्यमनगर, चंदूर, वारे वसाहत, मंगळवार पेठ येथील मर्दानी खेळांचे पथक, कोतोली येथील मुलींचे लेझीम पथक या पथकांनी मिरवणुकीत रंग भरला. सगळ््यात शेवटी सिंहासनारूढ छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा होता.
भगवे फेटे, पांढऱ्या रंगाचे झब्बे अशी पारंपरिक वेशभूषा केलेले शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे शिवाजी पुतळा येथे समाप्त झाली. यावेळी शाहीर आझाद नायकवडी, अशोक देसाई, किशोर घाटगे, दीपा पाटील, नगरसेविका लीला धुमाळ, सुरजितसिंह बाबर, दिलीप पाटील, बी. जी. मांगले, जयदीप सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj accepted the offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.