कलाक्षेत्रातील सव्वाशे वर्षांचा चैतन्यसूर
By Admin | Updated: January 4, 2016 00:38 IST2016-01-04T00:03:20+5:302016-01-04T00:38:11+5:30
लोकमतसंगे जाणून घेऊ ‘देवल क्लब’

कलाक्षेत्रातील सव्वाशे वर्षांचा चैतन्यसूर
सचिन भोसले -- कोल्हापूर
‘लोकमत’ने दोन वर्षांपूर्वी रोजच्या जेवणात ज्या वस्तू आपल्याला लागतात, त्या येतात कोठून, त्या किती लागतात यासंबंधीची माहिती वर्षभर ‘जाणून घेऊ लोकमतसंगे’ या सदरातून दर सोमवारी दिली. गतवर्षी आम्ही याच सदरातून कोल्हापुरात किती समाजाचे लोक राहतात, त्यांचे वर्षभर काय उपक्रम सुरू असतात, त्यांची लोकसंख्या किती आहे आणि समाज विकासासाठी त्यांचा काय उपयोग होतो याचा धांडोळा घेतला. यावर्षी आम्ही सांस्कृतिक कोल्हापूरचा वेध घेणार आहोत. जिल्ह्यात अनेक चांगल्या संस्था आहेत, त्या हिमतीवर समाजाची ज्ञानलालसा पूर्ण व्हावी यासाठी धडपडतात. अशा सगळ््या संस्थांची माहिती या सदरात आम्ही देणार आहोत.
कोल्हापूरला ‘कलापूर’ ही ओळख मिळवून देणाऱ्या कलावंताचा पहिला सूर अर्थातच ‘गायन समाज देवल क्लब’ होय. राजर्षी शाहू महाराजांच्या दातृत्वामुळे मंगळवार पेठेसारख्या मध्यवस्तीच्या ठिकाणी १८९३ ला ही जागा मिळाली. सव्वाशे वर्षांत अनेक वादळे, ऊन-पाऊस देवल क्लबच्या अंगावरून गेले. मात्र, हा सर्वांना प्रेरणास्रोत असलेला देवल क्लब कधीच हरविला नाही. आजही अनेक तारे-तारकांनी हा क्लब तेजोमयाने तळपत राहिला आहे. अशा या क्लबविषयी ‘लोकमत’संगे जाणून घेऊ.
करवीरवासीयांसाठी १८८३ चा काळ तसा भारावलेलाच म्हणावा लागेल. यामध्ये आर्य समाज, क्षत्रिय समाज, दैवज्ञ समाज अशा समाजाच्या उत्कर्षाच्या काळात केवळ गाण्यावरील प्रेमापोटी ‘करवीर गायन समाज’ची स्थापना विश्वनाथराव गोखले, त्र्यंबकराव दातार, गोविंदराव देवल, आदी ज्येष्ठ मंडळींनी केली. यामध्ये सभासदांकडून मासिक वर्गणी म्हणून चार आणे घेतले जात होते. त्यावेळच्या छत्रपती राजाराम कॉलेजच्या दर्शनी भागातील दोन खोल्या भाड्याने घेऊन करवीर गायन समाजची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यामध्ये भाऊसाहेब कागवाडकर, पोरेबुवा, पखवाजी, शिवरामबुवा शाळिग्राम, केशवबुवा गोगटे, अप्पैयाबुवा, बाळूबुवा गुळवणी ही मंडळी नियमितपणे गायनसेवा करीत होती. भास्करबुवा बखले यांच्या कोल्हापुरातील गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजनही त्या काळी या समाजानेच केले होते.
काळाच्या ओघात ‘करवीर गायन समाज’ची वाटचाल काही कारणाने मंदावली. पुढे गानकलेच्या प्रेमापोटी चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांचे वडील राजाराम बापू वणकुद्रे, त्र्यंबकराव दातार, बाबा देवल, विसूभाऊ गोखले यांनी बाबा देवलांच्या माडीवर एक खोली भाड्याने घेऊन तेथे नव्याने गाण्याचे कार्यक्रम सुरू केले. संगीत रंगभूमीवरचे गायकनट नाटकातील भूमिका वठवून झाली की, या ठिकाणी हजेरी लावत. त्यांची सरबराई बाबा देवल करीत. नाट्यकलावंतांची या ठिकाणी ये-जा सुरू झाली. यामध्ये चिन्नय्यास्वामी, रजबअली, अल्लादियाखाँसाहेब, हैदरखाँसाहेब, अब्दुल करीमखाँसाहेब, गोविंदराव टेंबे अशा दिग्गजांचा समावेश होता. हळूहळू ही जागाही अपुरी वाटू लागली. पुढे दैवज्ञ बोर्डिंगच्या मागे लुकतुकेंच्या माडीवर या मैफिली पुन्हा झडू लागल्या. गाण्याच्या वेडापायी एकत्र येण्याच्या जागेला ‘देवल क्लब’ म्हणून ओळख मिळाली. राजर्षी शाहू महाराजांनीही या क्लबसाठी सहा हजार
आणि जागाही ‘देवल क्लब’साठी दिली.
या क्लबला कायमस्वरूपी इमारत असावी म्हणून चित्रतपस्वी व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर यांनी माधवराज जोशी लिखित ‘विनोद’ नाटकाचे ठिकठिकाणी प्रयोग करून निधीसंकलन केले. त्यानंतर पुन्हा महाराजांनी तीन हजार रुपये बिनव्याजी संस्थानाला परत देणे या अटीवर दिले. इमारतीच्या उद्घाटनानिमित्त संगीत परिषद भरविण्यात आली. यामध्ये देशातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्याकाळी संपूर्ण देशात देवल क्लबचे नाव गाजले. तेव्हापासून आजतागायत या क्लबने अनेक संगीत महोत्सव घडवून आणले.
पन्नास वर्षांनी सुरू झाले नव्या वास्तूचे बांधकाम
छत्रपती राजाराम महाराजांच्या प्रथम पत्नी ताराबाई यांच्या काळात १९४६ ला प्रशासक म्हणून शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक हे होते. यावेळी पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून तत्कालीन मंडळींशी विचारविनिमय करून देवल क्लबला मोठी जागा असावी म्हणून सध्याच्या नव्या इमारतीची जागा दिली. याच काळात प्रायव्हेट हायस्कूल, तुतूच्या बागेसही जागा दिली.
काही काळानंतर संस्थेचा व्याप पुन्हा वाढला. जुनी इमारतही अपुरी पडू लागली. त्यानंतर १९९५ ला तब्बल ५० वर्षांनंतर या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. या काळात संस्थेकडे पाच हजार रुपये होते. त्यात महापालिकेची बांधकामासाठी परवानगीही मिळत नव्हती. तत्कालीन कार्यकारिणीने खटपट करून परवाना मिळविला. बांधकामास सुरुवात झाली. त्यात संगीत विद्यालय, नाट्य विभाग, आदींचे काम सुरू झाले.
आजही हे उपक्रम सुरू आहेत...
‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्, सर रतन टाटा ट्रस्ट, पुणे विद्यापीठ ललितकला केंद्र, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या नावाने स्थापन झालेले तरंगिनी सांस्कृतिक प्रतिष्ठान, गोवा सरकारच्या कलासंचालनालय व फायटो आर्टस सर्कलच्या सहयोगाने नियमित गाण्याचे कार्यक्रम होतात.
युवा पिढीतील मान्यताप्राप्त कलाकारांचे संगीत संमेलन दरवर्षी होतात.
याखेरीज शाहू सहकारी साखर कारखाना व घाटगे सरकार यांच्या सहयोगाने ‘संगीतसम्राट खाँसाहेब अल्लादियाखाँ संगीत महोत्सव, गोविंदराव गुणे स्मृतीनिमित्त हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत स्पर्धा, दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबईच्या सहयोगाने आंतरमहाविद्यालयीन
संगीत स्पर्धा होतात.
गायनकलेबरोबर नाटकाशीही संबंध
क्लबच्या उभारणीपासून नाट्यकलेशीही संबंध आहे. १९५४ ला क्लबच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त क्लबच्या नाट्यशाखेने ‘संगीत एकच प्याला’ हे नाटक सादर केले होते. या नाटकात नानासाहेब फाटक, हिराबाई बडोदेकर, दामूअण्णा मालवणकर, आदी दिग्गजांनी सहभाग घेतला होता. संगीत मानापमान, संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा, शितू, बाकी इतिहास, विसर्जन, आदिदास्य, तर अलीकडच्या काळात शाम मनोहरांचे हृदय, धर्मवीर भारतींच्या ‘अंधयुग’चे तसेच महाश्वेतादेवी यांच्या ‘हजार चौरसीया मॉँ’ असे नाट्यप्रयोग वेळोवेळी रंगमंचावर आणले आहेत.
देवल क्लबने गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी सध्याच्या नव्या इमारतीत ‘एज्युकेशन टू परफॉर्मन्स’ची सोय करण्याची संकल्पना योजिली आहे. या संकुलात व्यासपीठ, ध्वनिमुद्रण व्यवस्था, जुन्या दुर्मीळ ध्वनिफितींचे संकलन करण्याची सोय, संगीतावरील पुस्तके, ध्वनिमुद्रित तबकड्यांचे (आॅडिओ सीडीज)चे संकलन असलेले ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे.
- श्रीकांत डिग्रजकर, कार्यकारिणी सदस्य,
देवल क्लब
या दिग्गजांनीही येथेच गानसेवेने पूजा बांधली
भारतातील एकही असा दिग्गज नाही की, ज्यांनी देवल क्लबच्या व्यासपीठावर आपली कला सादर केली नाही. भास्कर बुवा बखले, गोविंदराव टेंबे (हार्मोनियम-पेटी), बालगंधर्वांचा सकाळपर्यंत चाललेला गाण्याचा आविष्कारही याच ठिकाणी घडला. ‘जोहार माय बाप जोहार’ ही पंढरीची आर्त हाकही येथेच घुमली. केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, मल्लिकार्जुन मन्सूर, लक्ष्मीबाई जाधव, शंकरराव सरनाईक, निवृत्तीबुवा सरनाईक यांच्या गायनाने, तर गुंडोपंत वालावलकर, विठ्ठलराव कोरगावकर (हार्मोनियम), प्रसिद्ध तबलजी धिरकवा, जगन्नाथबुवा पुरोहित, प्रसिद्ध सतारवादक रविशंकर, विलायतखाँ, फैयाजखाँ, विलायत हुसेन, अजमत हुसेन, अमीरखॉँ, अमानत अलीखाँ, हिराबाई बडोदेकर, सिद्धेश्वरबाई, रसुलनताई, किशोरी अमोणकर, माणिक वर्मा, आजमबाई, सरदारबाई कारदगेकर, पाध्येबुवा, मास्टर दीनानाथ, धोंडूताई कुलकर्णी, सवाई गंधर्व, शिवरामबुवा वझे, गजाननबुवा जोशी, पद्मा शाळिग्राम, वामनराव सडोलीकर, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, आप्पासाहेब देशपांडे, आदी दिग्गजांनी गानसेवेने पूजा बांधली; तर बळवंतराव रुकडीकर, बापूराव दिंडे, दादा लाड, गणपतराव गुरव, रमाकांत, केशवराव धर्माधिकारी, अष्टेकर तबलजी, भाऊराव टेंबे, मनोहर चरणकर यांच्यासारखे तबलावादक जरी काळाच्या पडद्याआड गेले असले तरी आपली साथसंगत पाठीमागे ठेवून गेले.
संगीत विद्यालयात शिकतात ३५० हून अधिक विद्यार्थी
दरवर्षी देवल क्लबतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘संगीत विद्यालय’मध्ये शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, हार्मोनियम, सतार, तबला, कथ्थक नृत्य, आदीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. हे संगीत विद्यालय अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहे.