वडिलांच्या अनुभवावरच चेतन नरकेंचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:39+5:302021-05-07T04:24:39+5:30
शब्बीर मुल्ला यवलूज वार्ताहर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मातब्बरांचा पराभव झाला असला तरी पन्हाळा तालुक्यातून ...

वडिलांच्या अनुभवावरच चेतन नरकेंचा विजय
शब्बीर मुल्ला
यवलूज वार्ताहर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मातब्बरांचा पराभव झाला असला तरी पन्हाळा तालुक्यातून जवळ-जवळ अर्धशतक काळ संचालक म्हणून गोकुळच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारे एकमेव ज्येष्ठ नेते व गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी चाणाक्ष राजनिती व सहकारातील अनुभवाच्या जोरावर सुपुत्र चेतन नरके यांची विजयश्री खेचून आणत त्यांच्या खांद्यावर तालुक्यातील गोकुळच्या विद्यमान संचालकपदाच्या नव्या जबाबदारीचे शिवधनुष्य दिले आहे. उच्चशिक्षित व अभ्यासू असलेले चेतन यांनी सहकार क्षेत्रातील गोकुळच्या या पहिल्याच निवडणुकीत वडील अरुण नरके यांच्या सतर्क राजकारणाच्या जोरावर विजयाची गुढी उभी केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या वाटचालीत अरुण नरके यांचा सहकाराचा जाणता अभ्यास असून त्यांनी आपल्या कार्यकाळात गोकुळच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्रास दूध संस्थांना वेळोवेळी दूध उत्पादक सभासदांसाठी असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला होता. गाव, वाडी- वस्तीवरील कमी अधिक दूध संकलन असणाऱ्या प्रत्येक दूध संस्थेच्या सर्वांगीण विकासकामासाठी व्यक्तिगत पातळीवर विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच दूध संस्थेत त्यांची गोकुळच्या माध्यमातून सदैव ऋणानुबंधाची घट्ट असलेली नाळ गोकुळच्या आखाड्यात प्रथमच नव्यानेच उतरलेल्या पुत्र चेतन यांच्या गोकुळ दूध संघातील यावेळीच्या संचालकपदाच्या विजयाने कायम असल्याचा या निवडणुकीतही प्रत्यय आला. अनुभवी नेते अरुण नरके यांनी निवडणूक रणांगणातून माघार घेतली असली तरी त्यांनी आपल्या पुत्राच्या खांद्यावर यापुढे आपल्या जबाबदारीचे ओझे टाकले आहे. गेली अनेक वर्षे पन्हाळा तालुक्यातील सर्वच सहकारी दूध उत्पादक संस्था ठरावधारक सदस्यांवर आजतागायत गोकुळच्या माध्यमातून एकतर्फी हुकमी पकड कायम ठेवण्यात हातखंडा असलेले ज्येष्ठ नेते अरुण नरके यांची कमालीची जादू यावेळीच्या गोकुळ दूध संघाच्या अटीतटीच्या झालेल्या संचालकपदाच्या निवडणुकीत दिसली. मातब्बरांच्या झालेल्या पराभवानंतरही नवख्या चेतन यांच्या विजयातून ती कायम असल्याचे दिसून आले.