ओढे-नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:33+5:302021-07-30T04:25:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ओढे-नाले व त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात ...

ओढे-नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता तपासणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ओढे-नाले व त्यांवरील पुलांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आले. पर्यावरण अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पूरनियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यासंबंधीचे निवेदन बुधवारी (दि. २८) पाठविले होते. त्या कार्यालयाकडून महापालिकेस आलेल्या सूचनांनुसार हे काम सुरू करण्यात आले आहे. महापुराचा अभ्यास केलेल्या नंदकुमार वडनेरे समितीनेही ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची महत्त्वाची शिफारस केली आहे. परवाच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत, अशा अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने यंत्रणा हलली आहे.
दोन वर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पूल पुरात वाहून गेल्यावर शासनाने सगळ्याच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने प्रमुख नऊ पुलांचे ऑडिट करून घेतले. परंतु ते सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आले. त्या पुलांची पाणी वाहून जाण्याची क्षमता किती आहे, याचा विचार त्यावेळी झाला नव्हता. आता ओढे-नाले व पूल यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता या एकाच हेतूने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील २०१९ ची पूररेषा आणि २०२१ चा पाऊस आधार धरून हे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी सांगितले.
धैर्यप्रसाद हॉलपासून सुरू होऊन विन्स हॉस्पिटलपर्यंत जाणाऱ्या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र किती आहे, त्यामध्ये किती पाऊस पडतो, त्याचे किती पाणी तयार होईल, त्यातील किती पाणलोट बुजले आहेत, आता किती आकारापर्यंत ओढ्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे, असा ढोबळमानाने प्रत्येक ओढ्याचा अभ्यास अपेक्षित आहे. अनेक नाले विनाकारणच थेट काटकोनात वळविण्यात आले आहेत. टाकाळ्यावरून राजारामपुरीत येणारा नाला किमान पाच ठिकाणी काटकोनात वळवण्यात आला आहे. तो सरळ करता येणे शक्य आहे का, याचीही शक्यता तपासून पाहिली जाणार आहे.
अतिक्रमणे काढणार...
ओढे सुरू होताना त्यांची रुंदी जास्त आहे. मध्येच त्यामध्ये अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण किती व कुठेपर्यंत झाले आहे, ते काढण्यासाठी काय करावे लागेल. समजा, ओढा सुरू होताना त्याची रुंदी पाच फूट होती, तर तेवढीच रुंदी शेवटपर्यंत करता येऊ शकेल का, असाही अभ्यास यामध्ये अपेक्षित आहे.
-----
काय करणार...
सर्वेक्षण करून हे सर्व नाले अगोदर कोल्हापूर महापालिकेच्या नकाशावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नाले सुरू होतात कुठून, ते कुठे संपतात, त्यांचे पाणलोटक्षेत्र यांची माहिती मिळेल.
पाहणी पथक
नगररचना विभाग, पाणीपुरवठा व सांडपाणी विभाग, नगर अभियंता आणि पर्यावरण अभ्यासक.
----
कोल्हापुरात प्रमुख नऊ नाले आहेत; परंतु त्याशिवायही इतरही छोटे-मोठे नाले आहेत.
जयंती, दुधाळी, फुलेवाडी, शाम सोसायटी, निकम पार्कशेजारील, जरगनगर, रामानंदनगर, गोमती नाल्याचे चार उपनाले, विद्यापीठातून वाहणारे, आरटीओ कार्यालय-विवेकानंद कॉलेजच्या मागील बाजूने वाहणारा ओढा, आयुक्त निवास ते बसंत-बहारपर्यंतचा, अशोक जाधव यांच्या घरापासून, मुक्त सैनिक वसाहतीतील चार नाले.
----
कोल्हापुरातील प्रमुख पूल
शाहूकालीन जयंती नाल्यावरील व विल्सन पूल. सिद्धिविनायक मंदिराजवळील दत्ताजीराव शेळके, दसरा चौक ते व्हीनस कॉर्नर, संभाजी पूल, सावित्रीबाई फुले रुग्णालयाची मागील बाजूस, गोखले कॉलेज ते बाईचा पुतळ्यापर्यंत दोन पूल, यल्लमा ओढ्यावरील, हॉकी स्टेडियमजवळील, जरगनगर, हनुमाननगर, डॉ. चंद्रकांत पाटील यांच्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या ओढ्यावरील, शास्त्रीनगरातील भैया घोरपडे यांच्या घराजवळील, ॲस्टर आधार रुग्णालयाच्या उजव्या व डाव्या बाजूकडील, प्रतिभानगरातील, सायबर ते राजेंद्रनगर दरम्यानचे तीन पूल.
तत्कालीन हेतू कालबाह्य
जेव्हा हे पूल बांधण्यात आले, तेव्हा त्या-त्या परिसराला वाहतुकीने जोडणारे म्हणूनच त्यांचा विचार झाला. त्या पुलांची पाणी वाहून नेण्याची क्षमता किती याचा विचार त्यावेळी व त्यानंतरही महापालिकेने कधी केलेला नाही. आता प्रथमच वाहतुकीशिवाय प्रत्येक पुलाखालून नक्की पाणी किती वाहून जाते, त्यातील अडथळे कोणते, ते काढण्यासाठी काय करावे लागणार व त्यासाठी नक्की खर्च किती येणार, याचे आराखडे केले जाणार आहेत.
२९०७२०२१-कोल-यल्लमा ओढा पूल
कोल्हापूर शहरातील यल्लमा ओढ्यावरील या पुलास किमान १० दरवाजे आहेत; परंतु पाणी मात्र कसेबसे चारच दरवाजांतून वाहते. अशीच स्थिती शहरातील बहुतांशी पुलांची झाल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह अडखळतो व तुंबलेले पाणी लोकांच्या घरादारांत घुसते. (नसीर अत्तार)