‘जलसंपदा’ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Updated: April 3, 2015 01:02 IST2015-04-03T01:02:10+5:302015-04-03T01:02:37+5:30
बिल मंजुरीसाठी आठ लाख : उपठेकेदाराकडून पोलीस ठाण्यात ‘व्हिडिओ क्लिप’ सादर

‘जलसंपदा’ अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
सातारा : पाणीपुरवठा योजनेचे काम देण्यासाठी आणि त्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्याकडून आठ लाख रुपये घेऊनही अंतिम बिल दिले नाही, अशी तक्रार उपठेकेदाराने शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिली. ‘जलसंपदा’चे दोन अधिकारी तसेच मुख्य ठेकेदाराविरुद्ध या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपठेकेदार दादासाहेब अण्णा वडर (चव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धोम पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता श्रीराम जाधव आणि उपअभियंता परशुराम कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कामाची पूर्ण रक्कम उपठेकेदाराला दिली नसल्याबद्दल दत्तसाई कन्स्ट्रक्शनचा राजू पवार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, राजू पवार याच्या लायसेन्सवर केंजळ चाहूर(देशमुखनगर, ता. सातारा) येथील पाणीपुरवठा योजनेची ५० हजार लिटरची टाकी आणि मुख्य वाहिनी तसेच पोटवाहिन्या, पंपसेट आणि पंपहाऊस असे काम जाधव आणि कांबळे या अधिकाऱ्यांनी आपल्याला दिले होते. या कामाचे अंदाजपत्रक ३२ लाख ९८ हजार ९६६ रुपयांचे होते. हे काम आपण फेब्रुवारी २०१३ मध्ये सुरू केले.
कामासाठी अॅडव्हान्स म्हणून धोम विभागाने २० लाख २७ हजारांची रक्कम मंजूर केली होती. त्यातून विविध करांची कपात करून राजू पवार (दत्तसाई कन्स्ट्रक्शन) याच्या खात्यावर १८ लाख ५० हजारांची रक्कम जमा झाली.
एप्रिल २०१३ मध्ये राजू पवारने आपल्या मामाचा मुलगा सागर याच्या बँक खात्यावर १६ लाख ४४ हजार रुपये जमा केले आणि उरलेले दोन लाख सहा हजार नंतर देईन, असे तोंडी सांगितले. (फिर्यादीचे मामा रावसाहेब धोंडिराम चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी आपली ओळख करून दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.) सागरने ही रक्कम आपल्याला रोख आणून दिली.
त्यानंतर एप्रिलमध्ये धोम पाटबंधारेमधील श्रीराम जाधव आणि परशुराम कांबळे यांनी योजनेचे काम दिल्याबद्दल आणि बिल मंजूर केल्याबद्दल आठ लाख रुपयांची मागणी केली. रावसाहेब चव्हाण यांच्यासमक्ष आपण हे पैसे दोन टप्प्यांत श्रीराम जाधव यांच्या हातात दिले.
पुरावा म्हणून आपण मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. नंतर ‘रनिंग बिल’ म्हणून अधिकाऱ्यांनी सहा लाख ६७ हजार रुपये मंजूर केले. करकपात करून राजू पवार याच्या खात्यावर पाच लाख ३९ हजार रुपये जमा केले.
राजू पवारने सागर चव्हाणच्या माध्यमातून तीन लाख ५० हजार आपल्याला दिले व उरलेले एक लाख ८९ हजार नंतर देतो, असे सांगितले.
२०१४ मध्ये योजनेचे काम आपण पूर्ण केले व अंतिम बिल म्हणून दोन लाख ७९९ रुपये मंजूर झाले. करकपात करून राजू पवारच्या खात्यावर एक लाख ८४ हजार रुपये जमा झाले. त्यातील एकही पैसा राजू पवारने आपणास दिला नाही.
सुरक्षा अनामत म्हणून काम झाल्यावर मला दोन लाख रुपये मिळणार होते, तेही राजू पवारने दिले नाहीत.
आॅक्टोबर २०१४ पासून उर्वरित सात लाख ७९ हजार रुपयांसाठी राजू पवारकडे आपण मागणी करीत असून, उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
मेमरी कार्ड मागविले...
संबंधित व्यवहारांच्या ‘व्हिडिओ क्लिप’ एका वाहिनीवरून बुधवारी सायंकाळी प्रसारित झाल्या होत्या. ज्या मोबाईलवरून चित्रण करण्यात आले, त्याचे मेमरी कार्ड पोलिसांनी फिर्यादीकडून मागविले आहे. त्याची सत्यता तपासण्यासाठी कार्ड प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित व्यवहारांबाबत माहिती घेण्याच्या सूचना सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आल्या आहेत. ‘फिर्यादीला बोलावून माहिती घेऊन पुणे कार्यालयास पाठविली जाईल आणि
त्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल,’ असे निरीक्षक बयाजी कुरळे यांनी सांगितले.)