आजरा तालुक्याच्या राजकारणात बदलाचे वारे
By Admin | Updated: May 13, 2015 21:26 IST2015-05-13T21:26:41+5:302015-05-13T21:26:41+5:30
पक्षनिष्ठांना तिलांजली : सोयीनुसार आघाड्यांमुळे मुरब्बी बॅकफूटवर, तर नवखे येताहेत पुढे

आजरा तालुक्याच्या राजकारणात बदलाचे वारे
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -आजरा तालुक्याच्या राजकारणात सद्य:स्थितीत बदलाचे वारे वाहू लागल्याने अनेकांनी आपल्या पक्षनिष्ठांना तिलांजली देऊन सोयीचे व आघाड्यांचे राजकारण सुरू केल्याने भविष्यात पक्षाचे काहीही होवो, पण आपले राजकीय भवितव्य उज्ज्वल कसे होईल? याला प्राधान्य देण्यास सुरूवात केल्याने अनपेक्षितरीत्या राजकीय पार्श्वभूमी नसलेली मंडळी पुढे येत आहेत, तर भलीभली मुरब्बी मंडळी बॅकफूटवर जात आहेत.
आजरा साखर कारखाना, आजरा ग्रामपंचायत, जि. प., पं. स. निवडणुकांपासून तालुक्याच्या राजकारणात हा प्रवाह स्थिरावू लागला आहे. कारखाना राजकारणात तत्कालीन अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या विरोधात सर्व मंडळी एकवटली अर्थात एकत्र येणारी मंडळी एकमेकांवरील पे्रमापोटी नव्हे, तर सत्तेसाठी एकत्र आली. सत्तांतर झाले. सत्तांतरानंतर या एकत्र आलेल्या मंडळींमधील वाद चव्हाट्यावर आले. वाद हा प्रकार निवडणुकीनंतर आला. पण, तत्पूर्वी आयुष्यात कारखान्यात संचालक, पदाधिकारी होईन, असे स्वप्नातही न वाटणारी मंडळी संचालकपदावर बसली. पाठोपाठ झालेल्या जि.प. व पं.स. निवडणुकांत कारखान्यातील सत्ताधारी मंडळींनी शह-काटशहाचे राजकारण केले. विधानसभा निवडणुकांमध्ये तर अंतर्गत वाद विकोपाला गेले. आमदार मंडळी विशिष्ट मंडळींचेच ऐकतात असा आरोप करीत आमदारांनाच घरी बसविण्यात आले.
कुणाचा पक्ष कुठला, गट कुठला याचा काहीच ताळमेळ नसल्याने राजकीय पटलावर सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. तालुक्यात देसाई मंडळींचे राजकारणावर वर्चस्व होते. मात्र, जिल्हा बँक निवडणुकीत या मंडळींनीही सोयीच्या भूमिका घेतल्या. त्यामुळे तालुका संघाच्या निवडणुकांमध्ये चुरस दिसणार आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळत आहे. स्थानिक कार्यकर्ते नेतेमंडळींच्या हातात राहिलेली नाहीत. नवजीवन उदयास येणाऱ्या कार्यकर्त्यांचे वरिष्ठ नेतेमंडळींशी काहीही देणेघेणे नाही. आमचे आम्ही बघू ही भूमिका दोन आमदारांसह के.पी. पाटील यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळेच तालुका खरेदी-विक्री संघासह आजरा साखर कारखाना, २ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नेत्यांच्या हातात राहिलेल्या नाहीत हे निश्चित.
गोंधळ निर्माण करणाऱ्या भूमिका
जिल्हा बँकेत नेतेमंडळींच्या भूमिकाही गोंधळ निर्माण करणाऱ्या ठरल्या. पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला द्यायची ? या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत सापडू न शकल्याने जयवंतराव शिंपी व अशोक चराटी यांच्यात लढत झाली खरी, परंतु दोघेही पक्षप्रमुखांकडून दुखावले गेले आहेत, ते नाकारता येत नाही.